BCCI Elections : ‘बीसीसीआय’ अध्‍यक्षपदासाठी रॉजर बिन्नींचे नाव आघाडीवर : आजपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरु | पुढारी

BCCI Elections : 'बीसीसीआय' अध्‍यक्षपदासाठी रॉजर बिन्नींचे नाव आघाडीवर : आजपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (BCCI President Election) अध्‍यक्षपदासह उपाध्‍यक्ष, सचिव, खजीनदार आणि संयुक्‍त सचिव पदांसाठी आजपासून ( दि. ११) निवडणूक प्रक्रिया राबविण्‍यात येणार आहे. ( BCCI Elections ) अध्‍यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचे नाव आघाडीवर असून, सचिवपदासाठी पुन्‍हा एकदा जय शाह हे आपला अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

BCCI Elections : खजिनदार पदासाठी आशिष शेलार करु शकतात अर्ज

बीसीसीआय निवडणुकीसाठी दि. ११ आणि १२ ऑक्‍टोबर रोजी अर्ज दाखल होणार आहेत. १३ ऑक्‍टोबर अर्जांची छाननी होईल. तर १८ ऑक्‍टोबरला निवडणूक होणार आहे. राजीव शुक्‍ला हे उपाध्‍यक्षपदासाठी दावेदार असू शकतात, असे मानले जात आहे. वृत्तसंस्‍था एएनआयने दिलेल्‍या माहितीनुसार, भाजपचे आमदार आशिष शेलार हे खजिनदार पदासाठी अर्ज करु शकतात. सध्‍या अरुण धूमल यांच्‍याकडे हे पद आहे. धूमल यांच्‍याकडे आयपीएलचे चेअरमनपद सोपविण्‍यात येणार आहे. तर संयुक्‍त सचिव पदासाठी देबोजित शौकिया अर्ज करणार आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची यादी आली होती. या यादीतील काही व्यक्ती या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी खेळाडू रॉजर बिनी यांचादेखील समावेश होता. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले होते. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

सोमवारी रात्री बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. पदाधिकार्‍यांच्‍या बैठकीत महत्त्‍वपूर्ण निर्णय होण्‍याची शक्‍यता आहे. सध्‍या सौरव गांगुली यांच्‍याकडे बीसीसीआयचे अध्‍यक्षपद आहे. गांगुली यांनी २३ ऑक्‍टोबर २०१९ रोजी बीसीसीआय अध्‍यक्षपदाची धुरा संभाळली होती. तर २४ ऑक्‍टोबर २०१९ रोजी जय शाह यांनी सचिवपदाची सूत्रे स्‍वीकारली होती. दोघांचाही कार्यकाळ ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये संपत आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार बीसीसीआयच्‍या घटनेत काही बदल केले आहेत. त्‍यानुसार गांगुली आणि जय शाह हे २०२५ पर्यंत आपला कार्यकाळ वाढवू शकतात. मात्र गांगुली यांनी पद सोडण्‍याची इच्‍छा यापूर्वी व्‍यक्‍त केली आहे. आता आयपीएल चेअरमनपदाची ऑफरही त्‍यांना देण्‍यात आली आहे. मात्र ते आतंरराष्‍ट्रीय क्रिकेट समिती ( आयसीसी ) अध्‍यक्षपदाची निवडणूक लढवतील, असे मानले जात आहेत.

रॉजर बिन्नी यांची कारकीर्द

अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी १९७९ ते १९८७ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादम्यान त्यांनी २७ कसोटी सामने खेळले असून ८३० धावा केल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे.

रॉजर बिन्नीने २७ कसोटीमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत. रॉजर बिन्नी यांचा १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी हाेते. या विश्वचषकात त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

 

Back to top button