Weather Forecast | मान्सून परतीचा प्रवास लांबला, राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार | पुढारी

Weather Forecast | मान्सून परतीचा प्रवास लांबला, राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार

Weather Forecast : पुढील ४-५ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मान्सूनच्या माघारीसाठी अनुकूल परिस्थिती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक, जळगाव, लातूर, नंदूरबार, पुणे, अहमदनगर, रायगड, नागपूर, मुंबईसह कोकण, कोल्हापूर या भागात पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील काही भागांत पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशातील अनेक भागांतून मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. विशेषतः उत्तर भारतात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सामान्यपणे सप्टेंबर मध्यावधीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. राजस्थानमधून मान्सून १७ सप्टेंबरच्या आसपास माघारी परततो. पण यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यातदेखील देशातील बहुतांश भागात पाऊस सुरु आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि उत्त प्रदेशच्या पश्चिम भागातून मान्सून माघारी परतला आहे.

पावसाची स्थिती दर्शवणारे सॅटेलाइट छायाचित्र

ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मान्सून माघारीचा प्रवास थांबला आहे. यामुळे राजस्थान, हरियाणा, दिल्ली, गुजरातचा पूर्व भाग आणि मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर ईशान्य भारत, बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्येही मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया खंडित झाली असून येथे मुसळधार पाऊस सुरू आहे.

ईशान्य राजस्थान आणि आजूबाजूच्या भागावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी चक्रावात असून दुसरे ईशान्य अरबी समुद्रापासून ते गुजरातच्या उत्तर-पूर्व राजस्थानपर्यंत तयार झाले आहे. आणखी एक टर्फ रेषा केरळ पासून मराठवाड्यातून कर्नाटक पर्यंत तयार झाली आहे. तर नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावर आणि उत्तर श्रीलंकेच्या किनार्‍यालगत चक्रीवादळाचे परिवलन आहे. पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather Forecast)

Back to top button