भंडारा : उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

भंडारा : उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

भंडारा,पुढारी वृत्‍तसेवा : तुमसर-बपेरा राज्य मार्गावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने धडक दिली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. योगेश प्रल्हाद बुरडे (वय २९) रा. वारपिंडकेपार ता. तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास तुमसर-बालाघाट मार्गावरील चुल्हाड येथे घडली. दिवस-रात्र वाळूचे ट्रक धावत असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे.

योगेश बुरडे काही कामानिमित्त तुमसरला गेला होता. परतीच्या वेळी गावाकडे येत असताना चुल्हाड गावालगत असलेल्या उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने जोरदार धडक दिली. एकेरी मार्ग असणा-या महामार्गावर पंचर झालेली ट्रॉली उभी होती. बपेराकडून रेती भरलेला ट्रक तुमसरच्या दिशेने निघाला होता. या ट्रकच्या लाईटने उभी असलेली ट्रॉली योगेशला दिसली नाही. त्‍यामुळे तो थेट ट्रॉलीला धडकला. यामध्ये योगेशचा जागीच मृत्यू झाला.

भंडारा-बालाघाट राज्यमार्गाला महामार्ग घोषित करण्यात आले असले तरी, एकेरी असणा-या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले नाही. या महामार्गावर नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील रेतीचे ट्रक महाराष्ट्रात नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने धावत आहेत. वाहनांची वर्दळ वाढल्याने सायकल चालविणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. यापूर्वी वाहनांच्या वर्दळीने अनेक अपघात झाले असून सिहोरा बस स्थानकावर मोठ्या अपघात होवू शकतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news