भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची डोक्यात वरवंटा घालून हत्या; पिंपळगाव येथील घटना | पुढारी

भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची डोक्यात वरवंटा घालून हत्या; पिंपळगाव येथील घटना

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात वरवंटा घालून पत्नीला ठार मारल्याची घटना घडली आहे. ही घटना पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अर्चना अरविंद रामटेके (वय ४०) असे पत्नीचे नाव आहे. अरविंद माधव रामटेके (वय ४३) या पतीला अड्याळ पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या सूत्रानुसार, पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अरविंद रामटेके यांचे चांदोली (ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) येथील अर्चनासोबत विवाह झाला होता. अरविंद मागील २ वर्षापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. शुक्रवारी (दि. ७ ऑक्टोबर ) रोजी पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अरविंदने घराचा दरवाजा बंद करून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला.

हा प्रकरणाची माहिती गावकऱ्यांनी मिळताच त्यांनी अर्चनाला उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले मात्र, डॉक्टरांनी अर्चनाला तपासून मृत घोषित केले. पती अरविंद रामटेके यांना अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र इंगोले व हवालदार भुमेश्वर शिंगाडे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button