पिंपरी : महापालिका नोकरभरतीसाठी 45 हजार उमेदवारांची दोनदा नोंदणी | पुढारी

पिंपरी : महापालिका नोकरभरतीसाठी 45 हजार उमेदवारांची दोनदा नोंदणी

पिंपरी : महापालिकेच्या ब आणि क गटातील विविध विभागांतील 16 पदांच्या 386 जागांसाठी सरळ सेवा भरतीसाठी तब्बल 1 लाख 30 हजार 470 अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले. त्यातील 45 हजार उमेदवारांनी दोनचा अर्ज केल्याचे तपासणीत समोर
आले आहे. राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या 16 पदांच्या 386 जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

त्यासाठी अर्ज करण्याकरिता 19 सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्या मुदतीमध्ये विविध पदासांठी 1 लाख 30 हजार 470 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 84 हजार 847 उमेदवारांनी एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरले आहे. तर 45 हजार 623 उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले नव्हते. त्यांना शुल्क भरण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्या मुदतीमध्ये अवघ्या 153 जणांनी परीक्षा शुल्क भरले आहे. तर उर्वरित 45 हजार 470 उमेदवारांनी दोनदा नोंदणी असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी परीक्षा शुल्क भरले नाही. दोन अर्जापैकी एक अर्ज बाद केला जाणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात परीक्षेचे नियोजन
एकाचे दोन अर्ज असल्यास त्यातील एक अर्ज बाद केला जाणार आहे. अर्ज पात्र ठरलेले व परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची परीक्षा राज्यभरामध्ये नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे, असे पालिकेच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

Back to top button