समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मोदींच्याच हस्ते होईल : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती | पुढारी

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मोदींच्याच हस्ते होईल : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. काही छोटी-छोटी कामे बाकी असल्याने आम्ही अजून तारखेसाठी आग्रह केलेला नाही. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर तारीख घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी नंतर ते बोलत होते.

ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषद वगळता अन्य तरतूद नाही. त्यामुळे नवीन लेखाशीर्ष तयार करुन ग्रामीण रस्त्यांसाठी निधी देण्यात येईल. ही कामे करताना गुणवत्ता चांगली असली पाहिजे, अशी विशेष सूचना केली आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावांचा विचार करताना ग्रामपंचायतींमध्ये कचऱ्याचा निचरा करण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन इत्यादींबाबत निर्देश देण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

४३,००० झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार असल्यामुळे त्यांना कर्जही मिळेल आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ मिळू शकतील. नागपुरातील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता वसतीगृहाची आणि उर्वरित कामे करणार असून मेयोसाठी सुद्धा बराच निधी दिला आहे. त्याची उर्वरित कामे करणार आहे. राज्याचे वित्तमत्री म्हणजे उपमुख्यमंत्रीच नागपूरचे पालकमंत्री आहेत. म्हणून निधीची कमतरता राहाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. म्हणजे भाषणात काहीतरी नवीन ऐकायला मिळेल असा टोला फडणवीस यांनी लगावला.

स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत ग्राम पंचायत हद्दीतील कचऱ्याची शास्रशुद्ध विल्हेवाट लावण्यात येईल. अडलेली विकास कामे कामे आणि निधी परत देण्यात येईल. “अमृत’ योजनेमध्ये नागपुरसाठी १५०० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. उपमुख्यमंत्रीच नागपुरचे असल्याने नागपुरला विशेष निधीची गरज नाही. नागपुरात दरवर्षी लाखोच्या संख्येने अनुयायी येतात. पण कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पण आता संघ मुख्यालयावर मोर्चा काढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. उच्चन्यायालयानेही मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे पोलिस योग्य कारवाई करीत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचंलत का?

Back to top button