America : अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या, कोरियन रुममेटला अटक | पुढारी

America : अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या, कोरियन रुममेटला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. वरुण मनीष छेडा (वय 20) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अमेरिकेच्या इंडियाना राज्यात ही घटना घडली. वरुण हा पर्ड्यू विद्यापीठात शिकत होता. बुधवारी त्याचा मृतदेह विद्यापीठात कॅम्पसच्या पश्चिमेला असलेल्या मॅककचॉन हॉलमध्ये आढळला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत वरुणच्या हत्या प्रकरणात त्याचा कोरियन रुममेटला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. संशयीत आरोपीचे नाव जी मिन जिमी शा असे असल्याचे न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितले आहे.

विद्यापीठ कॅम्पसमधून वरुणचा मृतदेह सापडला

कॅम्पसच्या पश्चिमेकडील मॅककचॉन हॉलमध्ये वरुणचा मृतदेह आढळून आला. विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला खुनाच्या आरोपाखाली बुधवारी अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. जी मिन जिमी शा मूळचा कोरियन आहे जो वरुणसोबत रूम शेअर करत असे. त्यानेच रात्री 12:45 वाजता फोनवरून हत्येची माहिती दिली. पोलीस प्रमुख लेस्ले व्हिएट यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती दिली. कालावधीबद्दल अधिक तपशील दिलेला नाही. वरुण विद्यापीठात डेटा सायन्सचे शिक्षण घेत होता. मॅककचॉन हॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरुण रात्री उशिरा ऑनलाइन चॅटिंग आणि गेमिंगमध्ये व्यस्त होता

वरूणचा बालपणीचा मित्र अरुणभ सिन्हा याने एनबीसी न्यूजला सांगितले की, मंगळवारी रात्री वरुण मित्रांसोबत ऑनलाइन चॅट करत होता आणि तो गेमिंगमध्येही व्यस्त होता. दरम्यान, त्यांना वरुणच्या ओरडण्याचा आवाज आला. अरुणभ त्या रात्री मित्रांसोबत खेळत नव्हता, पण मित्रांनी सांगितले की हल्ल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला आणि काय झाले ते त्यांना कळले नाही. बुधवारी सकाळी त्यांना वरुणच्या हत्येची माहिती मिळाली. यापूर्वीही आठ वर्षांपूर्वी अशीच घटना या कॅम्पसमध्ये घडली होती.

Back to top button