Shrikant Shinde Facebook Letter :''जिवापाड माया करणाऱ्या आईचा शाप...'' उद्धव ठाकरेंवर कडाडले श्रीकांत शिंदे | पुढारी

Shrikant Shinde Facebook Letter :''जिवापाड माया करणाऱ्या आईचा शाप...'' उद्धव ठाकरेंवर कडाडले श्रीकांत शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात श्रिकांत शिंदे यांच्या दीड वर्षाच्या लहान मुलाचा उल्लेख केला होता. या मेळाव्यात त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेत असताना नातवाला उद्देशून ‘त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे’ असे या भाषणात म्हटले होते. याच वक्तव्याचा श्रीकांत शिंदे यांनी गुरूवारी ( ६, ऑक्टो) त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पत्र (Shrikant Shinde Facebook Letter) लिहून समाचार घेतला. या पत्रात प्रत्युत्तर देत असताना ते म्हणाला की, एकच लक्षात ठेवा, पोटच्या बाळावर जिवापाड माया करणाऱ्या आईचा शाप सगळ्यात धारधार असतो, आणि बाळासाठी वाट्टेल ते करणाऱ्या हिरकणीचा हा महाराष्ट्र आहे. त्या हिरकणीचा अंश अजूनही सगळीकडे आहे.

बुधवारी (५, ऑक्टो) पार पडलेल्या दसरा मेळाव्यातील शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या सभेनंतरची राजकीय टीका अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या पत्रातील मजकुराने महाराष्ट्रातील राजकारणाला आता नवे मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप-प्रत्यारोपांचा समाचार शिंदे गट घेत आहेच, पण श्रिकांत शिंदे यांनी पत्र लिहून एका बापाची व्यथा मांडली आहे असं सांगितले आहे. त्यामुळे या भावनिक पत्राची चर्चा आता सोशल मीडियावर जोरदार होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कालच्या सभेतून त्यांच्या दीड वर्षांच्या नातवाचा उल्लेख केल्याबद्दल चांगले खडेबोल ठाकरेंना सुनावले होते. आजच्या या पत्रानंतर आता राजकीय वातावरण शिंदे यांच्या नातवापर्यंत येऊन ठेपलेलं दिसून आले आहे.

काय आहे श्रिकांत शिंदे यांच्या पत्रात?

शिंदे यांनी पत्रात असं लिहीले आहे की, रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षांच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं म्हणजेच माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती. तुम्ही तुमच्या मेळाव्याची जाहिरात काय केली होती? धगधगत्या हिंदुत्वाचे विचार ऐका वगैरे. कालच्या सभेत तुम्ही हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत ते फक्त तुम्हालाच ठाऊक. मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की, एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का? असे प्रश्न त्यांनी यात उपस्थित केले आहेत.

माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून, ‘त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे’ असं वक्तव्य केलंत तुम्ही. उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो? उद्धवजी, कुठे आदरणीय, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही. आदरणीय बाळासाहेबही विरोधकांवर जळजळीत टीका करायचे, पण त्यांनी असली हीन व गलिच्छ टिप्पणी कधीही केली नाही. अशा शब्दांमध्ये श्रिकांत शिंदे यांनी भावनिक पत्र लिहीत आपलं मत व्यक्त केलं.

हेही वाचा

Back to top button