करुणा शर्मा-मुंडे प्रकरण : करुणा शर्मा-मुंडे प्रकरणाने पुन्हा गदारोळ! | पुढारी

करुणा शर्मा-मुंडे प्रकरण : करुणा शर्मा-मुंडे प्रकरणाने पुन्हा गदारोळ!

परळी; विशेष प्रतिनिधी : करुणा शर्मा-मुंडे प्रकरण चांगलेच तापले आहे. यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून, मागील दोन दिवसांत झालेल्या नाट्यमय घडामोडींनी राज्यकर्ते, पोलिस प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे करुणा शर्मा-मुंडे प्रकरण समोर आल्यावर चांगलेच अडचणीत आले आहेत. करुणा यांना रविवारी परळीत अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांना त्यांच्या गाडीत पिस्तूल सापडले.

दरम्यान, समाजमाध्यमांत एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात अज्ञात महिला पोलिसांसमोर गाडीची डिकी उघडून आत काही तरी ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या सार्‍या नाट्यमय घडामोडींनंतर करुणा शर्मा-मुंडे व अन्य एका व्यक्तीवर अवैध शस्त्र बाळगणे, चाकू हल्ला करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, असा गुन्हा नोंद करण्यात आला.

जामीन अर्ज नामंजूर झाल्याने करुणा यांची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

करुणा यांनी आपण मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असून, मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन मुले असल्याचा दावा काही वर्षांपूर्वी केला होता.

धनंजय मुंडे आपला छळ करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, असा आरोपही करुणा यांनी केला होता.

या सार्‍या प्रकरणाचा वाद कोर्टात सुरू असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान, करुणा यांच्या लहान बहिणीनेदेखील धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला.

यावेळी धनंजय मुंडे यांनी या आरोपाचे खंडण करून समाजमाध्यमांद्वारे खुलासा करताना, करुणा आपल्या पत्नी असून, त्यांच्यापासून दोन मुले असल्याची कबुलीही दिली होती.

दोन दिवसांतील घडामोडी

करुणा यांनी समाजमाध्यमांद्वारे परळी येथे पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्याबाबत अनेक पुरावे सादर करण्याचा इशारा दिला होता.

यानंतर त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणत जिल्ह्यात पोलिसांनी नोटीस बजावली.

यानंतरही करुणा शनिवारी (दि. 4) रात्रीच बीडमध्ये दाखल झाल्या.

बीड येथे मुक्काम करून त्या रविवारी दुपारी परळीला रवाना झाल्या.

त्यांनी बीड जिल्ह्यात पाय ठेवल्यापासून पोलिस सोबत होते.

दरम्यान, परळीत जाताच करुणा वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गेल्या. पायरीचे दर्शन घेत असताना त्या ठिकाणी अगोदरच उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांना दर्शन घेण्यापासून रोखले. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी करुणा यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले.

त्या ठिकाणी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता, गाडीच्या डिकीत अनधिकृतरीत्या बाळगलेले एक पिस्तूल आढळून आले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना समाजमाध्यमांत एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली.

यात करुणा यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना रस्त्यात एक अज्ञात महिला पोलिसांसमोर गाडीची डिकी उघडून आत काही तरी ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

करुणा शर्मा-मुंडे यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली. तसेच करुणा यांच्यापासून दोन अपत्ये असल्याचे जाहीर केले होते.

काही दिवसांनंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन-चार महिने शांत झाले.

यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्यासोबत घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते.

मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा या संपत्तीपासून सामाजिक आणि राजकीय विषयावर कायम भाष्य करीत होत्या. तसेच फेसबुक लाईव्ह करत होत्या.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी परळीमध्ये येणार आहे तसेच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

करुणा शर्मा-मुंडे यांना न्यायालयीन कोठडी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी परळीत करुणा शर्मा-मुंडे रविवारी आल्या होत्या.

परंतु, पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून अटक केली.

सोमवारी त्यांना अंबाजोगाई न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

रविवारी त्यांनी सर्वप्रथम वैद्यनाथ मंदिर परिसरात जाऊन पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तिथे जमलेल्या काही महिलांनी त्यांना दर्शन घेण्यास विरोध केला.

यावेळी धक्काबुक्की केली. अखेर पोलिसी बळाचा वापर करीत करुणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Back to top button