BSUP Housing Scheme : बीएसयूपीच्या लाभार्थ्यांना अखेर मिळणार मोफत घरे; खासदार श्रीकांत शिंदे (Video) | पुढारी

BSUP Housing Scheme : बीएसयूपीच्या लाभार्थ्यांना अखेर मिळणार मोफत घरे; खासदार श्रीकांत शिंदे (Video)

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बीएसयूपीची (BSUP Housing Scheme) घरे बांधून तयार होती. मात्र विकास कामामध्ये बाधित झालेल्या लाभार्थ्यांना किंवा पालिकेला प्रत्येक घरामागे १७ लाख रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मोजावे लागणार होते. लाभार्थ्यांना हे पैसे पालिकेला देणे परवडणारे नव्हते तर पालिकेलाही केंद्र आणि राज्य सरकारला हे पैसे देणे कठीण होते. त्यामुळे बीएसयूपीच्या इमारती मधील बांधून पूर्ण असलेली घरे अनेक दिवस पडीक होती. मात्र लाभार्थ्यांना आणि पालिकेलाही या घरांसाठी आता एक रुपयाही मोजावा लागणार नसल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले. कल्याण पालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याआधीच मोठे प्रयत्न करून केंद्राकडून 3 लाख रुपये माफ करून घेतले होते. मात्र उर्वरीत १४ लाख रुपये माफ करण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक बैठका आयोजित केल्या. त्यानंतर विविध मार्ग काढून म्हाडाकडून १४ लाख रुपये माफ करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील अडीच महिन्यात बीएसयूपीच्या (BSUP Housing Scheme)  पडीक झालेल्या इमारतींची डागडुजी करून राहण्यायोग्य ४००० घरे तयार होतील. त्यापैकी पहिल्या ३५० लाभार्थ्यांना घरे तत्काळ स्वाधीन करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. उर्वरित घरे इतर प्रकल्पात बाधित होणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आणि आयुक्तांचे ५६० कोटी रुपये वाचणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

नवीन रस्ते तयार करताना मुख्य रस्त्यांना प्राधान्य देऊ आणि कोणते रस्ते प्रामुख्याने करायचे आहेत त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले. हे रस्ते मोठे करताना ज्या लाभार्थ्यांना याचा त्रास होणार त्यांना बीएसयूपीची घरे देण्यात येतील.

वेदांत फॉक्सकॉनचा करार झालाच नव्हता

वेदांत फॉक्सकॉन बद्दल बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनूसार एमआयडीसीकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकात वेदांत संदर्भात कोणताही करार झालाच नव्हता असे सांगत काही लोकप्रतिनिधींकडून अफवा पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली शहरात रंगले रस्त्यांवरून बॅनरयुद्ध

शहरात जे काही होत आहे ती माझी जबाबदारी आहे कारण मी या शहरांचा लोकप्रतिनिधी आहे. पुढील ६ ते ७ महिन्यात कल्याण डोंबिवली मधील जास्तीत जास्त रस्ते हे सिमेंटचे होतील, खड्ड्यांची समस्या दूर होईल, तसेच पाऊस असल्याने रस्त्यांची कामे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५००-६०० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असे त्यांनी शहरात सुरू असलेल्या बॅनर युद्धा संदर्भात विचारले असता नमूद केले.

हेही वाचा

Back to top button