नितीन गडकरी भाजपमध्ये नाराज, त्यांनी काँग्रेसमध्ये यावं: नाना पटोलेंची ऑफर | पुढारी

नितीन गडकरी भाजपमध्ये नाराज, त्यांनी काँग्रेसमध्ये यावं: नाना पटोलेंची ऑफर

अकोला: पुढारी वृत्तसेवा : सध्या केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. महाविकास आघाडीला बाजूला सारून आता भाजप आणि शिंदे सरकार सत्तेत आहे. तिकडे केंद्रात सुद्धा भाजप सरकार आहे. पण भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज आहेत, असे सांगून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. तर भाजप जातीयवादी पक्ष असून देशात अशांतता पसरवण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली.

केंद्र सरकार विरोधात लोकतांत्रिक पद्धतीने जो कोणी बोलेल त्याच्यावर ईडी लावली जाते, त्यांच्या मागे सीबीआय चौकशी लावली जाते. त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे, असाही आरोप पटोले यांनी यावेळी केला. आज केंद्र सरकारच्या विरोधात कोणी बोलत नाही. गडकरी यांची अलिकडची विधान बघता त्यांची नाराजी दिसून येत आहे. गडकरी यांचे भाजपमध्ये ऐकलं जात नाही. परंतु काँग्रेसमध्ये लोकतांत्रिक व्यवस्था असल्याने गडकरी यांनी काँग्रेस पक्षात यावे, अशी खुली ऑफर पटोले यांनी दिली.

सरकार पडेल या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार नाही

सरकार पडेल या भीतीने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सरकार करत नाही. जनतेचे नुकसान झाले तरी चालेल, पण सत्तेत बसून राज्य कसं विकता येईल, यावर राज्य सरकार काम करत आहे. राज्यात अतिवृष्टी झाली. मात्र, शेतक-यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत.

राहुल गांधीच अध्यक्ष व्हावे ही सर्वांची इच्छा

राहुल गांधीच पुन्हा अध्यक्ष व्हावे, ही देशभरातील सर्वांची इच्छा आहे. देश संकटात आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाला संकटातून गांधी परिवारच वाचवू शकतो. देशाला उभं करण्याची क्षमता फक्त राहुल गांधी यांच्यामध्येच आहे. त्यामुळे तेच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, ही सगळ्या काँग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button