धुळे : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

धुळे : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाची धामधूम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र धुळे तालुक्यातील आनंद खेडे गावातील एका तरुण अभियंत्याचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

धुळे तालुक्यातील आनंद खेडा परिसरातील गणेश विसर्जन पांझरा नदीच्या पात्रात करण्यात येत होते. यासाठी राकेश अशोक आव्हाड (वय २९) हा तरुण अभियंता देखील गेला होता. यावेळी नदीच्या फरशीवर असलेल्या रेतीवरून त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. या ठिकाणी खोल पाणी असल्यामुळे तो पाईपमध्ये वाहून गेला. यावेळी उपस्थित असणाऱ्या त्याच्या नातेवाईकांनी तसेच अन्य लोकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र पाईपमध्ये अडकल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्याला दुसऱ्या बाजूने बाहेर काढण्यात आले. यानंतर त्याला रुग्णालयात हलवले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली. या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button