अमरावती : पोलिसांनी पकडला ४३५ किलो गांजा, चौघांना अटक | पुढारी

अमरावती : पोलिसांनी पकडला ४३५ किलो गांजा, चौघांना अटक

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती जिल्ह्यातून गांजाच्या होत असलेल्या तस्करीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४३५ किलो गांजा पोलिसांनी पकडला. ट्रकमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (३ सप्टेंबर) मालखेड गार्डन फाट्याजवळील न्यू बादल हॉटेलसमोर नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली.
वृषभ मोहन पोहोकार ( वय २५, रा. रिद्धपूर), विक्की बस्तिलाल युवनाते (२०, रा. शिरजगाव कसबा), शेख अरबाज शेख ईलीयास (१९, रा. आझाद नगर) व शेख तौसिफ शेख लतीफ (१९, रा. रतनगंज) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील ३ वाहने व ४३५ किलो ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण ७४ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
गुरुवार २ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक चांदूर रेल्वे उपविभागात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आंध्र प्रदेशातून पांढरकवडा-चांदुर रेल्वे मार्गे अमरावती येथे ट्रकमधून गांजाची वाहतूक होत आहे. ही माहिती पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मालखेड गार्डन फाट्याजवळ न्यू बादल हॉटेलसमोर नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान आयशर ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये कॅरेटखालील पोत्यामध्ये गांजा असल्याचे आढळून आले. यांनतर पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का?

 

Back to top button