कोल्हापूर : मांढरे येथे गणेशोत्सव महाप्रसादावेळी गोळीबार, ५ जखमी, १० जणांना अटक, गावात तणाव | पुढारी

कोल्हापूर : मांढरे येथे गणेशोत्सव महाप्रसादावेळी गोळीबार, ५ जखमी, १० जणांना अटक, गावात तणाव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : मांढरे (ता. करवीर) येथे गणेशोत्सव मंडळाच्या महाप्रसाद कार्यक्रमावेळी भावकीतील दोन गटात वाद उफाळून आला. एका गटाने गोळीबार करून दहशत माजवली. काठी आणि दगडाने केलेल्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी मुख्य संशयित अभिजीत सुरेश पाटील यांच्यासह ११ जणांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यात मुख्य संशयित अभिजीत सुरेश पाटील, समीर कृष्णात पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील, विकास बाजीराव पाटील, दादासाहेब श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहुल कृष्णा पाटील, तुषार राजाराम पाटील (रा. सर्व मांढरे तालुका करवीर) यांचा समावेश आहे.

यापैकी दहा जणांना आज पहाटे करवीर पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी उदय सोनबा पाटील (वय 39 रा. मांढरे) यांच्यासह चौघेजण जखमी झाले आहेत. दोन गटातील संघर्षामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस निरीक्षक अजय कुमार शिंदकर, पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की गणेश उत्सवानिमित्ताने गावातील हनुमान तरुण मित्र मंडळामार्फत शनिवारी रात्री गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व ग्रामस्थ महाप्रसादासाठी उपस्थित होते. महाप्रसादाची पहिली पंगत पंगत सुरू करण्यापूर्वी अध्यक्षांनी फेटा बांधून पंक्तीसमोर पाणी घालण्याची प्रथा आहे. मात्र त्याला फाटा देऊन दुसऱ्यानेच पाणी घातल्याने गावातील एका गटाने हरकत घेतली.

या कारणातून वादावादी आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. गावातील प्रमुखांनी हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी सुरू झाली. यावेळी अभिजीत सुरेश पाटील यांनी बंदुकीचा परवाना नसतानाही फिर्यादी उदय पाटील यांच्या दिशेने 12 बोर बंदुकीतून गोळी झाडली. यावेळी उदय पाटील बाजूला झाल्याने सुदैवाने ते बचावले. या घटनेनंतर एका गटाने काठ्या व दगडाने हल्ला करून चौघांना जखमी केले.

नागरिकांनी तात्काळ करवीर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देताच पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये गोळीबार आणि हाणामारीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button