मालकाची रक्कम हडप प्रकरण : ‘त्या’ कर्मचारी महिलेस पाच दिवसांची पोलिस कोठडी; | पुढारी

मालकाची रक्कम हडप प्रकरण : ‘त्या’ कर्मचारी महिलेस पाच दिवसांची पोलिस कोठडी;

सांगली : पुढारी वृत्तसेवा मालकासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बोगस सह्या करून बँक खात्यावरून धनादेशद्वारे 47 लाख रुपयांची रक्कम काढल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अश्विनी राजेंद्र पाटील (वय 30, रा. वारणाली, सहावी गल्ली, विश्रामबाग) हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अभय जैन (रा. रतनशीनगर, सांगली) यांनी बुधवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जैन यांचे वखारभागात ब्लू स्टार एक्सटूजन प्रा. लि. नावाची कंपनी आहे. कंपनीमध्ये केमिकलचे उत्पादन केले जाते. या कंपनीत संशयित अश्विनी अकौंटंट म्हणून काम करीत होती. जैन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे तसेच कंपनीचे राजारामबापू बँकेच्या राजवाडा चौकातील शाखेत खाते आहे.

जैन कुटुंबातील सर्वांचे पासबूक व धनादेश कंपनीत होते. अश्विनीने ते चोरून त्यावर बनावट सह्या करून बँकेतून आतापर्यंत 47 लाखांची रोकड काढली होती. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. तिला रात्री उशिरा अटक केली.

Back to top button