धान खरेदी घोटाळा: ‘आविम’च्या उपप्रादेशिक व्यवस्थापकसह दोघे निलंबित | पुढारी

धान खरेदी घोटाळा: 'आविम'च्या उपप्रादेशिक व्यवस्थापकसह दोघे निलंबित

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा: धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने केलेल्या धान खरेदीत ३ कोटी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी नाशिक येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांनी धानोरा येथील आविमचे उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी आणि प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकोडे यांना निलंबित केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळांतर्गत विविध ठिकाणच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांकडून खरीप आणि रब्बी धान खरेदी केली जाते. अशीच सहकारी संस्था मुरूमगाव येथेही आहे. या संस्थेमार्फत २०२१-२२ मध्ये सभासद शेतकऱ्यांकडून खरीप व रब्बी हंगामातील ३३ हजार ६६९.५० क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. त्यापैकी २३ हजार ७९० क्विंटल धानाची उचल करण्यात आली. उर्वरित ९ हजार ८७८ क्विंटल धान गोदामात शिल्लक असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र हे धान गोदामात उपलब्धच नसल्याने दिसून आले.

या धानाची हमी भावाप्रमाणे किंमत १ कोटी ९१ लाख ६५ हजार १६३ रुपये एवढी आहे. शिवाय नियमाप्रमाणे संस्थेकडून दीड पटीने वसुलपात्र असलेली रक्कम २ कोटी ८७ लाख ४७ हजार ७४४ रुपये आणि बारदाण्याची रक्कम १५ लाख ८ हजार ५५३ रुपये अशा एकूण ३ कोटी २ लाख ५६ हजार २९८ रुपये इतक्या रकमेचा अपहार करुन शासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

त्यामुळे धानोरा येथील आविमचे उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी आणि प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकोडे यांना आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांनी निलंबित केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button