विरोधी पक्षातील आमदार, नेते, कार्यकर्ते फोडून भाजप बळकट करा : चंद्रशेखर बावनकुळे

विरोधी पक्षातील आमदार, नेते, कार्यकर्ते फोडून भाजप बळकट करा : चंद्रशेखर बावनकुळे

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या शिवसेनेतील नेते व कार्यकर्त्यांची फोडाफोडी करून भाजपाला आणखी मजबूत करण्याचे आवाहन भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. २० ऑगस्ट) बुलडाणा येथे जिल्हा भाजपाच्या बैठकीत केले.

प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर बावनकुळे यांनी शनिवारी पहिला दौरा बुलडाणा येथे केला. या बैठकीत बोलताना म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर मी प्राधान्याने हाती घेतलेला कार्यक्रम म्हणजे विरोधी पक्षातील आमदार व माजी आमदार स्तराच्या नेत्यांना फोडून भाजपात आणणे. आजच इकडे येताना बाळापूरचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते बळीराम सिरस्कार यांना भाजपात प्रवेश दिला आहे. तुम्ही कार्यकर्त्यांनीही बुथ लेवलवर विरोधी पक्षातील किमान पन्नास – पन्नास कार्यकर्त्यांना फोडा असे उघड आवाहनच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पन्नास आमदार फुटल्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याचे उदाहरणच त्यांनी आपल्या भाषणातून समोर ठेवले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी बुलडाण्यातून कमळ चिन्हावर भाजपाचा खासदार निवडूण आणण्याचे खुले आवाहन त्यांनी या बैठकीत केले. भाजपा भविष्यात बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने उतरणार असल्याचे संकेत देऊन प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले, या मतदारसंघासाठी भाजपा श्रेष्ठींनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. येत्या अठरा महिण्यात त्यांचे बुलडाणा जिल्ह्यात सहा दौरे होतील व प्रत्येकवेळी तीन दिवस ते जिल्ह्यात मुक्काम करतील. यावरून या मतदारसंघावर भाजपा श्रेष्ठींचे किती लक्ष आहे, हे ध्यानात घ्यावे. यादव यांच्या दौ-यापूर्वी इथला आढावा घेण्यासाठीच मी आलो आहे, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.

या बैठकीला भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, बळीराम सिरस्कार आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वबळाचे संकेत

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. राज्यात शिंदे गट व भाजपाची युती झाली असल्याने हा लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला जाईल, असे गृहीत धरले जात असताना भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर पहिल्या दौ-यासाठी याच मतदारसंघाची निवड केली व मजबूत पक्षबांधणीची रूपरेषा समोर ठेवली. यावरून भाजपाची वाटचाल ही स्वबळाच्या तयारीची असल्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news