Nagpur University : पूरपरिस्थितीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द | पुढारी

Nagpur University : पूरपरिस्थितीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Nagpur University) आज (दि १६ ) आणि बुधवारी (दि.१७) होणाऱ्या तिन्ही सत्रातील सर्व परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आलेले पेपर आज आणि उद्या घेण्यात येणार होते. मात्र, हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन अतिघाईत जारी करण्यात आलेल्या परीक्षांच्या तारखांमुळे पुन्हा एकदा परीक्षा रद्द करण्याची वेळ विद्यापीठावर ओढवली आहे.

(Nagpur University) राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्रच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पूर्व विदर्भातही अशीच स्थिती आहे. एकीकडे शहरात घराघरात पावसाचे पाणी शिरत असताना ग्रामीण भागात नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शिवाय भंडारा, गोंदिया आणि इतर जिल्ह्यांमध्येही अशीच पूरपरिस्थिती असल्याने विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत कसे पोहोचणार हा प्रश्न निर्माण झाला होता. रद्द करण्यात आलेले पेपर कधी घेण्यात येतील, याबद्दल अद्याप सांगण्यात आलेले नाही.

पूर परिस्थितीमध्ये बस आणि इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. याच कारणामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आज मंगळवारीही भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पाऊस आहे. त्यामुळे विद्यापीठाने दोन दिवसांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही गेल्या आठवड्यात बुधवारचे ७२ आणि गुरुवारचे ४२ अशा एकूण ११४ परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. बुधवारी रद्द झालेले पेपर हे १६ ऑगस्टरोजी तर गुरुवारचे रद्द झालेले पेपर २१ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते.

यापूर्वी नागपूर विद्यापीठाने अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परीक्षा रद्द करुन त्यापुढे ढकलल्या होत्या. या घटनेला महिनाही झालेला नाही. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा ?

Back to top button