

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा: एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात दावा सांगण्यात आलेला आहे. याला आक्षेप घेणारी याचिका ठाकरे गटाने याआधीच सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर लवकर सुनावणी घेतली जावी, अशी विनंती ठाकरे गटाकडून मंगळवारी न्यायालयाकडे करण्यात आली. यावर प्रकरण आमच्यासमोर प्रलंबित असून सुनावणीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरुन शिंदे आणि ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात एकमेकांसमोर ठाकले आहेत. दोन्ही गटांच्या याचिकांवर पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे तसेच पेच मोठा असल्याने घटनापीठ स्थापन करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
विशेष म्हणजे सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने तत्पूर्वी या सर्व खटल्यांचा निकाल लागणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील दाव्या-प्रतिदाव्यांवर तूर्त कोणताही निर्णय घेऊ नका, असे निर्देश ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते.
हेही वाचा :