लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक खासदार निवडून आणू : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक खासदार निवडून आणू : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप आणि शिंदे गटाचे मिळून ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्याचा संकल्प भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अमरावतीत केला आहे.

तर आगामी येवू घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या सर्व निवडणुका या भाजप आणि शिंदे गट एकत्रीतपणे लढवतील, अशीही घोषणा बावनकुळे यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी दिल्यामुळे आता भाजपाचा विचार पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करून तळागाळातील सर्वसामान्य जनतेला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. महाविकास आघाडी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी भाजाप आणि शिंदे गट मिळून सर्व अडचणींवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढच्या दोन वर्षात विदर्भ मराठवाड्याचा बॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहीन, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मोठे काम सुरू केले असून, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल. तर सौरउर्जेवर वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना वीज देऊ. एवढं चांगलं काम करू की, मविआच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button