येरमाळा येथील श्री येडेश्वरीची नारळी पौर्णिमा यात्रा उत्साहात | पुढारी

येरमाळा येथील श्री येडेश्वरीची नारळी पौर्णिमा यात्रा उत्साहात

येरमाळा; पुढारी वृत्तसेवा: येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा उत्साहात पार पडली. नारळी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. आज (दि.१२) देवीच्या पालखीची दहीहंडीसह गाव प्रदक्षिणा मिरवणूक, आराती, टाळ, मृदंग, ढोलकी, जहांज, संभळ, हलगीच्या गजरात काढण्यात आली. त्यानंतर पालखी मुख्य मंदिराच्या परिसरात आली. दुपारी साडेतीन वाजता दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला.

नारळी पौर्णिमेनिमित्त मानकरी पाटील कुटुंबीयांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवीची पालखी पाटील वाड्यात आली. गावातील महिला सकाळी देवीच्या पालखीस नैवेद्य दाखवतात. सकाळी ११ च्या दरम्यान पालखी विठ्ठल मंदिरातून बाहेर पडली. गाव प्रदक्षिणा करुन मंदिराकडे निघाली पालखी सोबत टाळकरी, आराधी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संबळ हलगीच्या गजरात वाजत गाजत पालखी गाव प्रदक्षिणा करत पालखी देवी मंदिर परिसरात आल्यानंतर चिंचेच्या झाडावर दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.

दहिहंडी फोडण्याचा मान हभप दत्तात्रय बोधले महाराज यांना असल्याने त्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी अमोल पाटील, श्रीराज पाटील यांच्यासह पालखीचे खंदेकरी, टाळकरी उपस्थित होते. दहीहंडी फोडण्यापूर्वी भजनी, आराधी मंडळींनी पाऊल, फुगड्या झिम्मा, खो-खो खेळत भाविकांचे मनोरंजन केले. आराधी, मानकरी, भजनी मंडळींच्या उत्साहाला उधाण आले होते. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button