मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षणासह राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाची १८ सप्टेंबर रोजी निवडणूक तर १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल. संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे केली.
मदान म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर रोजी तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
शहादा ७४, नंदुरबार ७५, शिरपूर ३३, चोपडा ११, यावल २, जामोद १, संग्रामपूर १, नांदुरा १, चिखली ३, लोणार २, अकोट ७, बाळापूर १, कारंजा ४, धारणी १, तिवसा ४, अमरावती १ चांदुर रेल्वे १, बाभुळगाव २ कळंब २, यवतमाळ ३, महागाव १, आर्णी ४, घाटंजी ६, केळापूर २५, राळेगाव ११, मोरगाव ११ झरी जामणी ८, माहूर २४, किनवट ४७, अर्धापूर १, मुदखेड ३, नायगाव (खैरगाव) ४, लोहा ५, कंधार ४, मुखेड ५, देगलूर १, औंढा नागनाथ ६, जिंतूर १, पालम ४, कळवण २२, दिंडोरी ५०, नाशिक १७, जुन्नर ३८, आंबेगाव १८, खेड ५,भोर २, अकोले ४५, अहमदपूर १, वाई १ सातारा ८ व कागलमधील १ अशा एकूण ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
हेही वाचलंत का ?