भद्रावती तालुक्यातील ७ गावे अजूनही पाण्यातच ; बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात | पुढारी

भद्रावती तालुक्यातील ७ गावे अजूनही पाण्यातच ; बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना प्रचंड महापूर आला आहे. भद्रावती तालुक्यातील 7 गावे तीन दिवसांपासून पाण्याखाली आले आहेत. सातही गावांतील नागरिकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहे. गावांना सध्या बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरिकांनी अद्याप गावे सोडलेली नाहीत. त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा गावात पोहचविण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील नागरिक हादरून गेले आहेत. अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ग्रामीण भागातून वाहणाऱ्या छोट्या मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. या नाल्यांच्या लगत असलेल्या आणि वर्धा नदीकाठावरील गावांना महापुरामुळे बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुरामुळे गावातून बाहेर पडणे कठीण झाल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने त्यांच्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

सध्या ज्या सात गावांना पुराचा विळखा आहे त्यामध्ये कोंढा, पळसगाव, माजरी, मनगाव, थोराना, कोच्छी आणि पिपरी आदी गावांचा समावेश आहे. या गावांतील भद्रावती तालुक्यातून वाहणारी सर्वात मोठी वर्धा नदी आहे. परंतु मागील काही वर्षांपासून तालुक्यात निर्माण झालेल्या डब्लू सी एलच्या कोळसा खाणीमुळे पूरपरिस्थिी निर्माण होत असल्याचे जाणकार सांगत आहेत. सध्या माजरी, चारगाव, कुनाडा, कर्नाटका एम्टा येथे कोळसा खाणी आहेत. त्या ठिकाणी खाणीतून निघणारी माती बाहेर आणून टाकण्यात येत असल्याने मोठमोठे मातीचे ढिगारे तयार झाली आहेत. त्यामुळे प्रवाहित होणारे पाणी अडते आणि परिणामी पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. कोच्छी व पिपरी ही दोन्ही गावे वर्धा नदीच्या काठावर आहेत. त्यामुळे त्यांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेथील नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. मागील तीन दिवसांपासून नागरिक गावातच आहेत. आवश्यक सेवेकरीता एनडीआरएफचे जवान त्यांना बाहेर घेऊन जात आहेत.

माजरी, पळसगाव, मनगाव, थोराना ह्या गावांतील छोट्या मोठ्या नाल्यांना आलेला पूर, वर्धा नदीचा पूर आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे अडलेले पाणी यांमुळे सातही गावात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पाटाळा गावापासून पिपरी चारगावाकडे वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र रूंद आहे. त्यामुळे नदीच्या बाहेर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने पूरस्थिती ही अधिकच गंभीर होत आहे. सध्या या सातही गावाचा तालुक्यासोबचा संपर्क तुटलेला आहे. गुरूवारी दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही पूरपरिस्थिीत कायम असल्याने नागरिक मात्र सध्यातरी संकटात आहेत.

कोच्छी गावात तापाची साथ, उपचारासाठी वैद्यकीय चमू गावात रवाना

वर्धा नदीच्या काठावर पिपरी आणि कोच्छी गावे वसली आहेत. ह्या दोन्ही गावांना बेटाचे स्वरूप्‍ प्राप्त झाले आहे. गावात तापाची साथ आहे. एनडीआरएफचे जवान वैद्यकीय तुकडीला बोटीतून गावात घेऊन जात आहेत. पूरपरिस्थितीत गावात आरोग्य सुविधा राहावी याकरीता वैद्यकीय विभागाच्या चमू सज्ज आहेत.

दुबारपेरणीही पाण्यात ; शेतकरी झाला चिंताग्रस्त

जुलै महिन्यात आलेल्या पुरात लागवड केलेली पिके नष्ट झाल्यांनतर शेतकऱ्यांनी पुन्हा खर्च करून दुबार पेरणी केली. परंतु अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. दुबार पेरणीत लागवड केलेली पिके पुन्हा पुरात सापडल्याने ती नष्ट होत आहेत. शेत पाण्याखाली गेल्याने शेतजमीन कसण्याकरीता घेतलेले कर्ज कसे चुकते करायचे हा यक्ष प्रश्न पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे.

माजरी गावाकडे जाणारा रस्ता अतिवृष्टीने खचला
एकतानगर वेकोली वसाहत ते माजरीकडे जाणारा रस्ता बंद पडलेल्या चारगाव कोळसा खाणीलगत अतिदृष्टीमुळे खचल्याने रहदारीस धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून प्रवाशांसह वेकोलीचे सुमारे 600 कामगार दररोज येजा करतात.

हेही वाचा

Back to top button