अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी | पुढारी

अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : शहरात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे व्यापारी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, प्रशासनाने पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव स्नेहलता बिपीनराव कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांची भेट घेऊन केली. कोपरगाव शहरासह परिसरात सोमवारी रात्री तब्बल चार ते पाच तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अनेक व्यापार्‍यांच्या दुकानांसह नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी काल शहरातील गुरुद्वारा रोडवरील नेहरू भाजी मार्केट, वाणी कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आपद्ग्रस्तांना धीर दिला.

सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड, नेहरू भाजी मार्केट आणि इतर भागातील अनेक लहान-मोठे व्यापारी तसेच संजयनगर, सुभाषनगर, आयेशा कॉलनी, बसस्थानकाच्या पाठीमागील परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी साचले. शेकडो व्यापार्‍यांच्या दुकानातील मालाचे आणि नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी तातडीने संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह धाव घेऊन नागरिकांच्या घरात आणि व्यापार्‍यांच्या दुकानांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मदत करून त्यांना दिलासा दिला. आपद्ग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणासह निवार्‍याची व्यवस्था केली.

दरम्यान, यापूर्वी कोपरगावात अशी नैसर्गिक परिस्थिती ज्यावेळी उद्भवली त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून दिली. गोकुळनगरी भागातील नाल्यावर पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करवून घेऊन पुलाचे काम पूर्ण केले, असे स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी सांगितले. आता तरी प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी. नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची त्वरित बैठक घेऊन पावसाने ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना ताबडतोब मदत करावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी केली.

अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरात हाऽऽहाकार उडालेला असताना प्रशासन मात्र बेफिकीर होते. खरे तर अशावेळी प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून संकटात सापडलेल्या लोकांना तातडीने मदत करणे गरजेचे होते; परंतु तहसील कार्यालयासह नगर परिषदेची प्रशासकीय यंत्रणा सतर्क नव्हती. प्रशासनाला अजिबात गांभीर्य नव्हते. एवढेच नव्हे, तर एकाही अधिकार्‍याने नागरिकांचे भ्रमणध्वनी उचलण्याची साधी तसदीही घेतली नाही. मदत करणे तर दूरच, ही बाब अत्यंत गंभीर आहे. -माजी आ. स्नेहलता कोल्हे

Back to top button