

कोल्हापूर : अनिल देशमुख मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या मार्गावरील रेल्वे फाटकावर उभारण्यात येणारा पादचारी उड्डाणपूल लटकणार आहे. या पुलासाठी महापालिकेने नव्याने डिझाईन तयार केले आहे, त्याला रेल्वेची कधी मंजुरी मिळणार, यावरच या पुलाचे भविष्य अवलंबून आहे. यामुळे येत्या काही दिवसांत या मार्गावरील पादचार्यांना परीख पूल किंवा शाहूपुरी या मार्गानेच ये-जा करावी लागणार, हे निश्चित आहे.
रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यापैकी प्लॅटफॉर्म क्रमांक एकचे काम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाले की, सध्या सुरू असलेले रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद होणार आहे. यामुळे मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या मार्गावरील पादचार्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. या मार्गावर पादचारी उड्डाणपुलाचा प्रस्ताव आहे. याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून 2017-18 यावर्षी 1 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी महापालिकेचा 55 लाखांचा 30 टक्क्यांचा स्व:हिस्सा आहे, तर शासन अनुदान म्हणून 70 टक्क्यांनुसार 1 कोटी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रस्तावाला 31 मार्च 2018 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, महापालिकेला 80 लाख रुपये वर्गही करण्यात आले आहेत. यापैकी 33 लाख 29 हजार 495 इतके शुल्क महापालिकेने रेल्वेकडे जमाही केलेेले आहे.
या पुलाचे डिझाईन 13 नोव्हेंबर 2018 साली पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून तपासून रेल्वेला अंतिम मंजुरीसाठी सादर केले आहे. मात्र, आजतागायत या डिझाईनला रेल्वेने मंजुरी दिली नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या डिझाईनमध्ये रेल्वेकडून बदल होण्याची शक्यता गृहीत धरून या नव्या बदलासह ठेकेदारास काम करणे बंधनकारक राहील म्हणून निविदा काढली. त्यानुसार तांत्रिकद़ृष्ट्या पात्र ठरलेल्या कंत्राटदाराची निविदाही मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, या कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी 30 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला आहे. या डिझाईनला रेल्वेने मंजुरी न दिल्याने तसेच शासन हिश्श्याची उर्वरित रक्कम न मिळाल्यानेे ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नव्हते.
दरम्यान, रेल्वेने पादचारी पुलाबाबत नवी नियमावली तयार केली. त्यानुसार या 54 मीटर लांबीच्या अखंड पुलाला मंजुरी देता येणार नसल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांनी पुण्याच्या बैठकीत स्पष्ट केले. त्यानंतर 30 मीटरपेक्षा कमी दोन स्पॅनला मंजुरी घेण्याचे ठरले, त्यानूसार जागेवर मार्किंग करून त्याच्या ले-आऊट करून, त्यावर पुलाची अलयामेंट मार्क करण्यात आली आहे. त्यानुसार नवे डिझाईन तयार करण्यात आले आहे. रेल्वे अधिकार्यांसमवेत जागेवर पाहणी करून हे डिझाईन अंतिम मान्यतेसाठी रेल्वेला सादर केले जाणार आहे. यानंतर या पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याकरिता किती महिन्यांचा कालावधी जाईल, हे निश्चित नाही. यामुळे हा पादचारी पूल हवेतच लटकणार आहे, हे स्पष्ट आहे.
रेल्वे फाटकातून वयोवृद्ध, अपंग, महिला, विद्यार्थ्यांसह दररोज वीस-पंचवीस हजारांहून अधिक पादचारी ये-जा करतात. रेल्वेगाड्यांची ये-जा, त्यांचे शटिंग (गाडी मागे-पुढे घेणे) यामुळे अनेकदा दोन रुळांमध्ये थांबावे लागते. अशावेळी अनेकजण गाडीसमोरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात, यावेळी अचानक गाडी सुरू होते, त्यावेळी धावपळ उडून अपघात होण्याची भीती असते.
फाटक बंद झाले, तर पादचार्यांना परीख पुलाचा पर्याय आहे. परीख पूल पादचार्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. राजारामपुरीकडून वाहने वेगाने बसस्थानकाच्या दिशेने जात असतात, अशावेळी हा पूल पार करताना पादचार्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे फाटकावर पादचारी उड्डाणपूल तत्काळ उभा करण्याची गरज आहे.