नागपूर : रेल्वेच्या धडकेत वाघ ठार | पुढारी

नागपूर : रेल्वेच्या धडकेत वाघ ठार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : वनविभागाच्या मध्य चांदा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या राजुरा वन परिक्षेत्रातील चनाखा वनबिटात रेल्वेच्या धडकेत वाघ ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बल्लारपूर ते काझीपेठ या मध्य रेल्वेच्या मार्गातील चनाखा ते विहिरगाव दरम्यान ही घटना घडली.

रेल्वे विभागाचा गँगमन नेहमीप्रमाणे रेल्वे ट्रॅकची तपासणी करीत असताना चनाखा ते विहिरगाव दरम्यान चनाखा वनबिटातील कक्ष क्रमांक १६० मध्ये रेल्वे रुळालगत वाघ ठार झाल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच रेल्वे स्टेशन प्रमुखाला याची माहिती दिली. तसेच राजुरा वन कार्यालयाला कळविले. वाघ ठार झाल्याची माहिती मिळताच तत्काळ उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर, वनरक्षक संजय जाधव यांनी वनमजुरांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
याबाबत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना याची माहिती देऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही घटनास्थळी बोलवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या मार्गात आतापर्यत वाघ, अस्वल, चितळ हे वन्यप्राणी ठार झाले आहेत. यामुळे या मार्गाच्या बाजूने संरक्षण जाळी लावण्याची मागणी वन्यजीव प्रेमी संघटनेने केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button