अकोला : शाळा बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून ४६ हजार लाचेची मागणी; सरपंच पती एलसीबीच्या जाळ्यात | पुढारी

अकोला : शाळा बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून ४६ हजार लाचेची मागणी; सरपंच पती एलसीबीच्या जाळ्यात

अकोला; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणाच्या बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी अकोट तालुक्यातील ग्राम जऊळका येथील ग्रामसेवक व सरपंचच्या पतीने शासकीय कंत्राटदारास ४६ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
त्यानुसार ४० हजाराची लाच घेतांना सरपंचच्या पतीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी करण्यात आली.  याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री उशिरा ग्रामसेवकासह सरपंच पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अकोट तालुक्यातील ग्राम जउळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणाचे बांधकाम शासकीय कंत्राटदाराने पूर्ण केले. त्याचे बिल ४ लाख ६६ हजार १३२ रुपये अदा करावयाचे होते. यासाठी सरपंचचे पती आशिष दत्तात्रय निपाणे (वय ३५ वर्ष रा. जउळका ता. अकोट) व ग्रामसेवक उत्तम देविदास तेलगोटे (वय ५२ वर्ष रा. खानापूर वेस ता. अकोट) या दोघांनी दहा टक्के प्रमाणे ४६ हजार रुपये लाच मागितली.

तडजोडीनंतर कंत्राटदाराने ४० हजार देण्याचे कबूल केले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार ४० हजार रुपये लाच घेतांना सरपंचचे पती आशीष निपाणे यास करोळी फाट्यावरील इस्सार पेट्रोलपंपावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २ ऑगस्टला संध्याकाळी रंगेहाथ पकडले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने  सरपंचचे पती आशिष निपाणे व ग्रामसेवक उत्तम तेलगोटे मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी सरपंचचे पती आशिष निपाणे याला अटक केली आहे तर ग्रामसेवक उत्तम तेलगोटे फरार असल्याने त्याचा शोध सुरु आहे.
एसीबीचे पोलिस निरिक्षक नरेंद्र खैरनार व सहका-यांकडून आरोपी ग्रामसेवकाचा शोध सुरु आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक यु.व्ही. नामवाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

  हेही वाचलंत का?

 

 

Back to top button