काका-काकीने खासगी डायरीतील मजकूर वाचल्याने पुतणीची आत्महत्या | पुढारी

काका-काकीने खासगी डायरीतील मजकूर वाचल्याने पुतणीची आत्महत्या

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  सख्ख्या काका आणि काकूने पुतणीच्या डायरीत लिहिलेला मजकूर वाचला आणि पुतणीला लिहिलेल्या मजकूराचा जाब विचारला. यावर माझ्या डायरीतला खासगी मजकूर का वाचला असे विचारत तरूणीने आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पर्सनल डायरीतील अत्यंत खासगी मजकूर जाणीवपूर्वक काका काकूंनी वाचल्याने ही तरूणी दुखावली गेली. दुखावल्या गेलेल्या या उच्च शिक्षित तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा येथे उघडकीस आली आहे. निकिता असे आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आहे. निकीताचा भाऊ पंकजने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काका रत्नाकर आणि काकू मंगला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रत्नाकर हे एक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

निकिता या तरुणीला बालपणापासूनच स्वतःची डायरी लिहिण्याची सवय होती. ज्या गोष्टी ती कुणाला सांगू शकायची नाही. त्या सर्व बाबी ती डायरीत लिहायची. त्यामुळे तिच्या मनावरील ताण हलका व्हायचा. स्वतःच्या व्यस्था, वेदना कुणापुढे मांडण्यापेक्षा डायरीत व्यक्त होणे तिला आवडायचे. काही दिवसांपूर्वी निकिताच्या चुलत बहिणीवर शस्त्रक्रिया झाल्याने काका रत्नाकर यांनी निकीताला मदतीसाठी नेले होते. त्यावेळी तिला अत्यंत वाईट वागणूक मिळाली. सख्या काका काकूकडून आलेला अनुभव तिने तिच्या खासगी डायरीत लिहून ठेवला होता.

निकिताने तिच्या पर्सनल डायरीत काकूसाठी “डेव्हील ऑफ द फॅमिली” असे लिहिले होते. काही दिवसांपूर्वी काका काकूनी तीची डायरी चोरून वाचल्यानंतर काका- काकू चांगलेच संतापले होते. नातेवाईकांना गोळा करून या बाबत जाब विचारणार असल्याची धमकी तिला दिली होती. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातूनच निकिताने गळफास घेऊन आत्महत्या केली. यासाठी काका रत्नाकर आणि काकू मंगला जबाबदार असून निकिताच्या भावाने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा

Back to top button