Wardha Flood : वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, हिंगणघाटमधील ४७९ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले, बचावकार्य सुरु | पुढारी

Wardha Flood : वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, हिंगणघाटमधील ४७९ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले, बचावकार्य सुरु

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यात संततधार पावसाने पूरस्थिती (Wardha Flood) गंभीर बनली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस, पुरामुळे अंदाजे ८३५ गावांत सुमारे ६३ हजार हेक्टरवर शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हिंगणघाट मंडळात २११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बहुतांश भागात अतिवृष्टी झाली असून काही प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिंगणघाट शहरालाही पुराचा फटका बसला. हिंगणघाट तालुक्यातील सुमारे ४७९ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शहरासोबतच पुराचा विळखा घातलेल्या गावांतील कुटुंबांना सुरक्षित हलविण्याची मोहीम सुरुच आहे.

अतिवृष्टीमुळे हिंगणघाट शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागाला जबर फटका बसला. वना नदी तसेच इतरही नदी, नाले तुडुंब भरले. वना नदीचे पाणी गाडगेबाबा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, शितला माता मंदिर आदी भागात शिरले. इतरही काही भागात पुराचे पाणी गेले. हिंगणघाट तालुक्यातील ४५० च्या वर कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

हिंगणघाट शहराचा वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. हिंगणघाट, देवळी तालुक्यात पुराचा फटका बसलेल्या ग्रामीण भागातील अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आजनसरा येथे संत भोजाजी महाराज देवस्थानच्या प्रसादालय परिसरात पुराचे पाणी आले होते. येथे दोन बसेस अडकल्या होत्या.

पूरपरिस्थितीत ६१ गावे बाधित

पुराचा फटका ६१ गावांना बसला आहे. पूरग्रस्त कुटुंबाची संख्या १ हजार ३०३ इतकी आहे. ८३५ गावांत शेतीचे नुकसान झाले आहे. बाधित शेती क्षेत्र ६३ हजार ३२६ हेक्टर इतके आहे. नदी, नाल्याना आलेला पूर, विविध प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग झाल्याने मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. (Wardha Flood)

अश्रूंचाही पूर

मोठा पूर पाहून अनेकांना धडकीच भरली. घर सोडून जाताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेत.

Back to top button