नगर : प्रवरेकाठी सतर्कतेचा इशारा; पाणलोटात दमदार पाऊस | पुढारी

नगर : प्रवरेकाठी सतर्कतेचा इशारा; पाणलोटात दमदार पाऊस

नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या दमदार आषाढ सरींमुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भंडारदरा आणि निळवंडेतून प्रवरा पात्रात 1600 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर, नांदूर मध्यमेश्वरमधून गोदापात्रात 39 हजार 338 क्यूसेकने जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावले आहे. दरम्यान, प्रवरेतून विसर्ग वाढवण्याच्या हालचाली सुरू असून, प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा आणि मुळा पाणलोटातही संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मुळा धरणात सायंकाळी 10 हजार 342 क्यूसेकने आवक सुरू होती. तर धरणाचा साठा 15300 दलघफू (60 टक्के) इतका झाला होता.

भंडारदर्‍यात सकाळी 8 हजार 843 दलघफू पाणीसाठा झाला होता. पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्याने नदी, ओढे, नाले तुडूंब वाहत आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचे परिचालन सूचीनुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करायचे असल्याने धरणाच्या गेटमधून प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. धरणात येणारी आवक पाहता पुढे विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी सोडावे लागणार असल्याने अकोले व संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

धरण पाणीसाठा टक्के
(दलघफू)
भंडारदरा 8843 81
निळवंडे 6298 76
मुळा 15291 60
आढळा 1060 100
घोड 4658 78
सीना 688 29
विसापूर 277 34

सूर्यदर्शन आणि पुन्हा सुरू होणार पाऊस ..!
दि. 20 जुलैपासून अनेक भागात सूर्यदर्शन होणार आहे. त्यानंतर साधारणतः 23 जुलैला परत राज्यात पाऊस होणार आहे. त्यानंतर 28,29,30 जुलैला परत एकदा पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे.

Back to top button