यवतमाळ : धो-धो पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती; बेंबळाचे १८ दरवाजे उघडले | पुढारी

यवतमाळ : धो-धो पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती; बेंबळाचे १८ दरवाजे उघडले

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत धो-धो सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने उघडण्यात आले आहे. पुढील काही तास पाऊस असाच राहिला तर आणखी दोन दरवाजे पूस प्रकल्पाचे उघडले जाणार आहे. बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसाने राळेगाव तालुक्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या ठिकाणी बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाच वेळी नदीपात्रात आल्याने नाल्यांचे पाणी गाव शेजारीच थांबले आहे. यातून गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत राळेगाव तालुक्यातील १०० घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील वर्धा नदीवर बांधलेल्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. अपर वर्धा प्रकल्पाचे सर्व १३ दरवाजे पहाटे ५ वाजता १५० सेमीने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बाभूळगावसह कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राळेगाव तालुक्यातील सावंगी गावामध्ये ३० घरांना पुराचा वेढा पडला आहे. एकबोर्जी गावातील ३५ घरे पुराच्या पाण्यात आली आहे. झाडगाव येथील ३० घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रावेरी येथील १५ घरे, चिकणा येथील १२ घरे व सावनेर मधील १० घरांना पुराचा वेढा बसला आहे.
बाभूळगाव तालुक्यातील सरुळ गावामध्ये पाणी शिरले. या ठिकाणचे ११ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. यातील सात नागरिकांना ग्रामस्थांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढले. मात्र चार नागरिक मंदिरावरच चढून होते. आपत्ती व्यवस्थापन बोट आल्याशिवाय उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर तालुक्यातून बोट या गावात पोहोचली. चार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने पुरातून बाहेर काढले.

विद्यार्थ्याचा नालीत बुडून मृत्यू

यवतमाळ शहरानजीक वडगाव रोड परिसरात मुलकी भागात असलेल्या नालीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. जय शंकर गायकवाड (१२, रा.मुलकी, यवतमाळ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  तो येथील देवराव पाटील विद्यालयात सातव्या वर्गात शिकत होता. आज सकाळी तो शाळेत आला. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने सकाळी पाऊस कमी होताच शाळेला सुट्टी देण्यात आली. तेव्हा मी घरी मित्रांसह व्यवस्थित जातो, असे वर्ग शिक्षकांना सांगून तो गेला. त्यानंतर मुलकी भागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत पाय धुण्यासाठी उतरला. त्यावेळी पाय घसरून नालीत बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती अवधुतवाडी पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला.  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.  अधिक तपास अवधुतवाडी पोलीस करीत आहे.
हेही वाचा:

Back to top button