ज्ञानवापी : शिवलिंग पूजेसाठीच्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी | पुढारी

ज्ञानवापी : शिवलिंग पूजेसाठीच्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : ज्ञानवापी मशिदीत आढळलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायलयाने परवानगी दिली आहे. २१ जुलैला ही सुनावणी होईल. स्थानिक कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, ज्ञानवापी मशिदीत झालेल्या सर्व्हेत मशिदीच्या परिसरात शिवलिंग मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. तर मुस्लिम पक्षाने हे शिवलिंग नसून कारंजा आहे, असा दावा केला आहे. त्यानंतर हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

या सर्व्हेक्षणाविरोधात अंजुमन इन्तेझामिया मशिद कमिटीची याचिका २१ जुलैला बोर्डवर घेतली जाणार आहे. याच दिवशी शिवलिंगच्या पूजेची आणि दर्शनाची परवानगी मिळावी, अशी मागणी ॲड. विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयात केली. त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.

जैन यांनी म्हटले आहे की, “मशिदीच्या परिसरात जे शिवलिंग मिळाले आहे, त्याची पूजा करण्याची आणि दर्शनाची परवानगी मिळावी अशी आमची मागणी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या शिवलिंगाचे कार्बन डेटिंगसारख्या तंत्राचा वापर करून वयोमान मोजावे.” १७ मे रोजी सर्वोच्च न्यायलयाने हा परिसर सुरक्षित केला जावा, असे आदेश दिले होते; पण हे करत असताना मुस्लिम समुदायाच्या नमाज पठणाच्या अधिकारावर गदा येणार नाही, असेही म्हटले होते.

त्यानंतर हा खटला जिल्हा न्यायलयाकडे वर्ग करण्यात आला होता. जिल्हा न्यायलयात हा खटला सुनावणी योग्य आहे का?, हा निर्णय येईपर्यंत हे अंतरिम आदेश लागू राहणार आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button