नगर : पाथर्डी शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर | पुढारी

नगर : पाथर्डी शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या जोरदार कवायती सुरू असताना शिवसेना तालुकाप्रमुखांनी घेतलेल्या बैठकीवर शहरप्रमुखांनी आक्षेप घेतल्याने सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली.

पाथर्डी नगरपालिकेत शिवसेना सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहे. शिवसेना व पक्षश्रेष्ठींचा जसा आदेश राहील, त्या पद्धतीने नगरपालिका निवडणूक लढवली जाईल, असे शिवसेना पक्षातील वरिष्ठांकडून शहरप्रमुख सागर राठोड यांना सांगण्यात आले, असा दावा राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. पक्ष निर्णय घेईपर्यंत स्थानिक पातळीवर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बोलू नये व परस्पर निर्णय घेऊ नये, निवडणूक स्वबळावर लढवायची की, महाविकास आघाडी राहील, हा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाईल, असे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याचे राठोड यांचे म्हणणे आहे.

सर्वच पक्षांत बैठकांना ऊत

पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. नेतेमंडळींच्या बैठकांना उत आला आहे. भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, आमदार मोनिका राजळे यांनी बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांना दिले आहेत.

शहरात जेमतेम ताकद असणार्‍या शिवसेनेत; मात्र निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बैठक घेण्यावरुनच वाद उफाळून आला आहे. तालुकाप्रमुखांनी घेतलेल्या बैठकीला शहरप्रमुखांनी दांडी मारली. तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी बैठक घेऊन संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, स्वबळावरच आजमावणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. शहरप्रमुख सागर राठोड यांनी पत्रक काढून स्वबळ की, आघाडी याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगितले. मात्र, या पत्रकबाजीमुळे सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

राष्ट्रवादीची महाविकासची तयारी

प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने प्रताप ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयात बैठक घेऊन महाविकास आघाडीतील सहकारी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसही ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याचे तालुकाध्यक्ष नासीर शेख यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांची वरिष्ठ नेत्यांकडे मी तक्रार केली होती. तालुकाप्रमुख म्हणून मला त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नाही. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर मी वाचणार आहे. आम्ही पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मी स्वतः शिवसेना शहरप्रमुखांना या बैठकीचे निमंत्रण दिले होते.

                                                             – अंकुश चितळे, तालुकाप्रमुख, शिवसेना

तालुका प्रमुखांनी घेतलेल्या बैठकीस मला निमंत्रण नव्हते. तालुकाप्रमुख अंकुश चितळे वैयक्तिक निर्णय घेतात. पक्षाचे संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांचे आदेश पाळत नाहीत. पालिकेच्या निवडणुकीसाठी तालुकाप्रमुखांनी घेतलेल्या बैठकीला जे कार्यकर्ते हजर नव्हते, त्यांची नावे उपस्थितांमध्ये टाकली. शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझ्या अधिकारांपासून मला लांब ठेवत आहेत. विश्वासात न घेता तालुकाप्रमुख शहरातील निर्णय घेतात.

                                                                 – सागर राठोड, शहरप्रमुख, शिवसेना.

Back to top button