गडचिरोलीत पुराचा हाहाकार : रस्ता वाहून गेला, अनेकांच्या घरांत शिरले पाणी; एकाचा मृत्यू | पुढारी

गडचिरोलीत पुराचा हाहाकार : रस्ता वाहून गेला, अनेकांच्या घरांत शिरले पाणी; एकाचा मृत्यू

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथे रात्री अनेक जणांच्या घरात पुराच्या पाणी शिरले. नागपेल्ली येथे आपत्ती निवारण दल आणि पोलिसांनी १ महिन्याच्या बाळासह सुमारे ७० जणांना सुरक्षितरित्या स्थलांतरीत केले आहे. गडअहेरी पुलाजवळचा रस्ता पुरामुळे तुटल्याने अहेरी-देवलमरी, बोरी-आलापल्ली मार्गावरील दळणवळण वाहतूक बंद झाली होती. सोमवारी ( दि. ११)  कोरची तालुक्यातील बोरी येथील विशाल उमराव कल्लो (वय १९) या युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला.

मध्यरात्री नागेपल्ली येथील राममंदिर आणि सेवासदन परिसरातील काही नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. आपत्ती निवारण दलाने स्थानिक युवकांच्या मदतीने २५ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढून इतर नागरिकांच्या घरी स्थलांतरीत केले. सेंट फ्रांसिस शाळेजवळच्या परिसरात पाणी वाढत असल्याने पोलिसांच्या मदतीने त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत सुमारे ७० नागरिकांना सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आले आहे.  अहेरीनजीकच्या गडअहेरी नदीवर पुलाचे बांधकाम सुरु आहे. या पुलाच्या समोरील रस्ता पुरामुळे तुटला आहे. अहेरीच्या सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे.

सर्वाधिक पाऊस अहेरी तालुक्यात

मागील चोवीस तासांत अहेरी तालुक्यात सर्वाधिक २०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सर्वांत कमी १५ मिलीमीटर पाऊस देसाईगंज तालुक्यात पडला.

हेही वाचलंत का? 

Back to top button