पुण्यात आगामी 72 तास मुसळधार; दहा दिवसांत 131 मिलिमीटर | पुढारी

पुण्यात आगामी 72 तास मुसळधार; दहा दिवसांत 131 मिलिमीटर

पुणे : जून महिन्यात शहरात केवळ 34 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे शहरात पाणीकपातीची वेळ आली होती. मात्र, जुलै महिन्यात घाटमाथ्यावरील कमी दाबाच्या पट्टयांनी शहरात पाऊस आणला अन् दहा दिवसांत 131 मिमी पावसाची नोंद झाली. तरीही शहरात अजून 82 मिमी पावसाची तूट आहेच. दरम्यान, 12 ते 14 जुलैपर्यंत घाटमाथ्यावर अतिमुसळधार, तर शहरात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

जूनमध्ये शहरात गेल्या 25 वर्षांतील नीचांकी पाऊस झाला होता. महिनाभरात अवघ्या 34 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या भोवताली असलेल्या धरणांतील पाणीपातळी घटल्याने शहरावर पाणीकपातीचे संकट आले होते. मात्र, जुलै महिन्यातील पावसाने ही कपातीची वेळ थांबवली. जूनमध्ये शहरावर हवेचे दाब खूप जास्त होते. सुमारे 106 हेक्टा पास्कल इतका जास्त दाब असल्याने शहरात पाऊस पडत नव्हता. मात्र, जुलै महिन्यात शहरावरील हवेचे दाब हे 1002 हेक्टा पास्कल इतके झाल्याने जुलैच्या दहा दिवसांत 131 मिमी पाऊस झाला.

आर्द्रता वाढली, तापमान घटले..

मुसळधार पावसाला जसे कमी दाबाचे पट्टे अनुकूल असावे लागतात, तसेच शहरातील हवेची आर्द्रता मुसळधार पावसाचा अंदाज देते. जूनमध्ये शहराची आर्द्रता 70 टक्क्यांवर होती. मात्र, जुलैमध्ये ती 90 टक्क्यांवर गेली. गेल्या पाच दिवसांपासून शहराची आर्द्रता 93 ते 98 टक्के आहे. तसेच शहराचे कमाल तापमान जूनमध्ये 35 अंशांवर होते, ते जुलैमध्ये 28 अंशांवर खाली आले. सोमवारी शहराचे तापमान 25.9 अंश इतके होते.

Back to top button