Guru Paurnima 2022 : जाणून घ्‍या काय आहे गुरू पौर्णिमेचे महत्त्‍व … तारीख आणि तिथी

गुरू पौर्णिमा 2022
गुरू पौर्णिमा 2022

पुढाली ऑनलाइन डेस्क : गुरूर्ब्रह्मा गुरू विष्णू गुर्रूर देवो महेश्वरा। गुरू साक्षात परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।। भारतीय संस्कृतीसह संपूर्ण विश्वात गुरू पौर्णिमेचे महत्त्‍व अनन्य साधारण आहे. गुरुंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद या दिवशी घेतले जातात. 2022 ची गुरू पौर्णिमा उद्या ( बुधवार, दि. 13 जुलै) आहे. हिंदू कालगणनेनुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महर्षि वेद व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला, अशी मान्यता आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

2022 ची गुरू पौर्णिमा बुधवारी  पहाटे चार वाजल्यापासून सुरू होऊन गुरुवारी (दि.14) सकाळी 6.00 वाजता तिथी समाप्ती आहे. या दिवशी गुरू पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढील आयुष्यासाठी गुरुंचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले जाते. तर अनेक ठिकाणी गुरु पादुका पूजनाचे आयोजन केले जाते.

फक्त हिंदू धर्मातच नाही तर गुरू पौर्णिमेच्या दिवशीच भगवान गौतम बुद्धांनी त्यांची शिकवण पहिल्या पाच अनुयायांना दिली. त्यानंतर ते बोधगयेतून सारनाथ येथे गेले. जैन धर्मानुसार याच दिवशी भगवान महावीर गुरू बनले. त्यांनी त्यांच्या पहिले शिष्य गौतम स्वामी यांना शिकवण दिली.

गुरू पौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात?

महर्षि व्यास हे दूरदृष्टी असलेले ऋषी होते. भविष्यात लोकांना धर्म पालनासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांनी संपूर्ण एकाच वेदाचे चार भाग केले. ऋगवेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्यामुळे त्यांना वेद व्यास असे म्हणतात. या व्यतिरिक्त महाभारतासारखे अजरामर काव्य व्यासांनी दिले. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला अशा या महान महर्षिंचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा म्हणतात.

गुरुंचे महत्त्‍व विशद करणारा महाभारतातील एक प्रसंग

महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण आणि बर्बरिकमध्ये संवाद झाला. यावेळी श्रीकृष्ण बर्बरिकला विचारतात गुरू आणि ईश्वर यात कोण श्रेष्ठ आहे. यावेळी बर्बरिक उत्तर देतो 'गुरू'! यावर श्रीकृष्ण पुन्हा विचारतात ते कसे काय? तर बर्बरिक उत्तर देतो की, गुरुंशिवाय परमेश्वराचे दर्शन घडू शकत नाही. गुरू आपल्याला फक्त आयुष्यात मार्ग दाखवत नाही तर त्यांच्यामुळेच आपण ईश्वराचे दर्शन करू शकतो. गुरू नसेल तर ईश्वराचे दर्शन शक्य नाही, म्हणून ईश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान गुरूंचे आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news