Nitin Gadkari : सदृढ लोकशाहीसाठी न्यायव्यवस्था बळकट असणे गरजेचेः नितीन गडकरी | पुढारी

Nitin Gadkari : सदृढ लोकशाहीसाठी न्यायव्यवस्था बळकट असणे गरजेचेः नितीन गडकरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपली लोकशाही ही चार स्तंभावर उभी आहे. त्यामधील न्यायव्यवस्था अतिशय बळकट, दर्जेदार असणे हे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. लोकशाहीतील प्रत्येक घटक दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात व्यक्त केले. लोकशाही चालविणाऱ्या यंत्रणेतील प्रत्येक घटक हा दर्जेदार असणे आवश्यक आहे, त्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला जागतिक दर्जाची ओळख बहाल करा, असे आवाहनही गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

बुटीबोरी येथील महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, लोकशाहीसाठी विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका, प्रसारमाध्यम हे चार स्तंभ असतात. स्वतंत्र तसेच निष्पक्ष न्यायपालिकेवरच आपली लोकशाही टिकून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर हे शैक्षणिक हब तयार होत आहे. नागपूरचे विधी विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे व्हावे. व त्याचा अधिक चांगला विस्तार व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असून शक्य ती सर्व मदत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मिहानमध्ये आज बहुसंख्य आयटी कंपन्या आल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शहरातील व विदर्भातील तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. आतापर्यंत ५६ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून येत्या २ वर्षात १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत राष्ट्रीय महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था निर्माण होत नाहीत, या संस्थामधून मानव संसाधन तयार होत नाही, तोपर्यंत विकासाची संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही. कायद्याचे राज्य आणि न्याय प्रदान प्रक्रिया ही अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचली पाहिजे. ही विश्वसनीयता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी विधी क्षेत्रात वैश्विक मान्यता असलेले मानव संसाधन तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button