चंद्रपूर : ‘त्या’ बेपत्ता तरुणीचे गूढ उलगडले; गळा आवळून केला खून | पुढारी

चंद्रपूर : 'त्या' बेपत्ता तरुणीचे गूढ उलगडले; गळा आवळून केला खून

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या एका २० वर्षीय युवतीची निर्घूणपणे हत्या करून पंपहाऊसच्या विहीरीत मृतदेह टाकून दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.८) रोजी उघडकीस आली. ऐश्वर्या खोब्रागडे असे मृत युवतीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा येथे राहत होती. ऐश्वर्या ब्रम्हपूरी तालुक्यातील बेटाळा येथील महाराष्ट्र फार्मसी कॉलेजमध्ये शिकत होती. सुमारे अकरा महिन्यांपासून ती बेपत्ता होती. तिचा मृतदेह ब्रम्हपुरी तालुक्यातील हरदोली येथील वैनगंगा नदीच्या काठावरील पडक्या विहीरीत आढळून आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील डॉक्टर दिगंबर खोब्रागडे यांची २० वर्षीय मुलगी ऐवर्श्या खोब्रागडे ही ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथील महाराष्ट्र फार्मसी कॉलेज येथे शिक्षण घेत होती. ती येथेच भाड्याच्या घरात राहत होती. शिक्षण घेत असताना ऐवर्श्या १० ऑगस्ट २०२१ रोजी बेपत्ता झाली. यानंतर ऐवर्श्याच्या वडिलांनी ब्रम्हपुरी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. यासाठी काही तपास पथके तयार करण्यात आली होती.  पोलिसांनी केलेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे वडसा येथील तुषार उर्फ राजू बुज्जावार यास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. तपासा दरम्यान तुषारने ऐश्वर्या हिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा केला.

यात संदीप पटले याने हरदोली शेतशिवारातील वैनगंगा नदीकाठावरील पंप हाऊसजवळ ऐवर्श्याला घेऊन गेला. त्या ठिकाणी संदीप व तुषार याने तिचे डोके पंपहाऊसवर आदळून गंभीर जखमी केले. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांनीही तिचा मृतदेह पंपहाऊसच्या विहिरीत टाकून दिल्याची माहिती तुषारने सांगितले आहे. तसेच ऐवर्श्याची बॅग लगतच्या झुडपात फेकून दिल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे ब्रम्हपूरी पोलिसांनी, वैनगंगा नदीकाठावरील पाण्याच्या टॉकीच्या पंपाहाऊसमधील विहीरीतून कुजलेल्या अवस्थेतील ऐवर्श्याचा मृतदेह बाहेर काढला. तसेच झुडपामध्ये फेकून दिलेली बॅग ताब्यात घेतली आहे. ऐवर्श्याचे चप्पल, जिन्स पॅन्टवरून तिच्या वडिलांनी तिची ओळख पटविली आहे.

ऐश्वर्या खोब्रागडे हत्या प्रकरणात तुषार उर्फ राजू बुज्जावार, संदीप उर्फ रेखलाल दुर्गेश पटले (रा. वडसा ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार बुज्जावार यास अटक करण्यात आलेली आहे. तर आणखी एका फरारी आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करून शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार रोशन यादरव, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे, पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button