आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करु, पावसाळी अधिवेशनाच्याआधी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.९) पत्रकार परिषदेत सांगितले. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली दौऱ्याबाबत माहिती दिली. या दौऱ्यामागे कोणताही राजकीय अजेंडा नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शिंदे पुढे म्हणाले की, राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, अशी आमची भूमिका आहे. सध्या राज्यात पूरपरिस्थिती असल्याने पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत दिल्लीत तुषार मेहतांशी चर्चा केल्याचेही शिंदे यावेळी सांगितले. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीसाठी मते मागून निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता राज्यात भाजप सेना सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार आले आहे. राज्यातील जनतेच्या मनात जे सरकार होते, ते सरकार सत्तेवर आल्यामुळे जनतेच्या इच्छेनुसार सरकार स्थापन झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सर्वसामान्य लोकांचे, सर्वांच्या मनातील सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हितासाठीस त्यांच्या न्याय हक्कासाठी सरकार कारभार करेल. महाराष्ट्राच्या विकासात पंतप्रधान मोदींचे व्हिजन समजून घेणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कारभार करून राज्याला प्रगतीपथावर नेले जाईल. राज्याच्या विकासात केंद्राचा सिंहाचा वाटा असतो. नव्या सरकारला मोदी- शहांचे आशीर्वाद लाभले आहेत. केंद्राचा पाठिंबा मिळाला की राज्य प्रगतीकडे जाते, असा विश्वास व्यक्त करून राज्यात सत्ता स्थापन करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील खंडित झालेले प्रकल्प पूर्ण करणाऱ्यांवर आमचे लक्ष असेल. नवे सरकार पुढील अडीच वर्षे पूर्ण करेल, पुढील निवडणुकांही जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याची टीका केली आहे. यावर शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महाराष्ट्राचे तुकडे करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. शिवसेनेतील आमचं बंड नव्हे, तर पक्षातील क्रांती आहे. मागील अडीच वर्षे सभागृहात तोंड दाबून मुक्याचा मार खात होतो. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे त्य़ांनी सांगितले. ५० खोकं कसलं, मिठाईचे का ? असा प्रतिसवाल करत बंड केलेले आमदार पैशांच्या मागे लागून आलेले नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button