औरंगाबाद : वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; अजिंठा वन परिक्षेत्रातील दुसरी घटना | पुढारी

औरंगाबाद : वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; अजिंठा वन परिक्षेत्रातील दुसरी घटना

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा: अजिंठा -बुलढाणा महामार्ग ओलांडत असताना अजिंठागावाजवळील महात्मा ज्योतिबा फुले शाळेसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.९) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

या घटनेची माहिती वनविभागास मिळाताच विन विभागाचे वनसंरक्षक एल. जी. बोरसे व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनेचा पंचनामा केला. तरस हा दोन वर्षांचा नर जातीचा असल्याचे समोर आले आहे. पशु वैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी शवविच्छेदन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जे. सोनवणे यांनी दिलेल्या सुचनेनुसार, वनपरिमंडळ अधिकारी एच. एच. सय्यद, वनकर्मचारी यांनी मृत तरसाला ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

याआधी अजिठा परिसरात अज्ञात वाहनाने धडकेत एका काळविटाचा शुक्रवारी मुत्यू झाला होता. यानंतर दुसऱ्या घटनेत शनिवारी वाहनांच्या धडकेत एका तरसाचा मृत्यू झाला आहे. सद्यपरिस्थितीत वाहतूक मोठ्या प्रमाणावर या भागात सुरू झाल्याने असे अपघात होत आहे. तरसांची संख्याही कमी होत असल्याने प्राणी मित्रांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

तरस हा रात्रीच्यावेळी बाहेर पडतो. अज्ञात वाहनाच्या धडकेत या तरसाचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जे. सोनवणे यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button