जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे धरण असलेले हतनूर धरण यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. यापूर्वी हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले असून आज पुन्हा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक मोठया प्रमाणात झाली आहे. परिणामी, शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे २० दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून ६० हजार ६७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यात तसेच शेजारील मध्य प्रदेशात तापी नदी क्षेत्रात गेल्या दोन- तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तापी नदी पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १७.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून ४९.४० दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
या प्रकल्पाची क्षमता २५५ दलघमी असून सद्यस्थितीत पाणीपातळी ५६.९० दमघमी म्हणजेच २०९.८६ मिटर इतकी आहे. प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या आवकेत वाढ झाल्याने गुरूवारी सायंकाळी प्रकल्पाचे ८ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. तर शुक्रवारी सकाळी १४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले.
आज शनिवारी पुन्हा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आली असून 60 हजार 671 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात आणि ९०० क्यूसेक पाणी कालव्याव्दारे सोडले जात आहे.
प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक लक्षात घेता पाणी प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये अथवा जनावरे नेऊ नयेत, असे आवाहन प्रकल्प अभियंता एन. पी. महाजन यांनी केले आहे.
हेही वाचलंत का?