भाजपात ताकद असेल तर निवडणूका घ्या; आमदार नितीन देशमुख यांचे आव्हान | पुढारी

भाजपात ताकद असेल तर निवडणूका घ्या; आमदार नितीन देशमुख यांचे आव्हान

अकोला पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमागे भाजापचे कटकारस्थान असून भाजपला महाविकास आघाडी सरकार अस्थिर करायचे आहे. पण हे कोणत्याही परिस्थितीत साध्य होणार नाही. भाजपात ताकद असेल तर निवडणूका घ्या असे आव्हान सुरत येथून परत आलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केले.

बुधवारी संध्याकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुरत येथून नागपूरला व नागपूर येथून थेट देशमुख अकोल्यात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करीत असून जनतेच्या भावनांशी भाजपाला काहीही घेणेदेणे नाही. एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करून भाजपाने मोठे कारस्थान रचले असल्याचा आरोपही देशमुखांनी केला. राज्यातील सर्व शिवसेना आमदार उद्धव साहेबांच्या सोबत आहेत. कुणीही ठाकरेंच्या विरोधात उभा नाही.

एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सेनेचे वरिष्ठ नेते करीत आहेत. त्यांच्याही मनात कुठलाही द्वेष नाही. भाजप सेनेमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ते कदापी शक्य होणार नाही. भाजपला केवळ सत्ता पाहिजे आहे. ती मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. भाजपाला एवढाच विश्वास असेल तर त्यांनी परत निवडणूका घ्याव्यात. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.
मी निवडून आलो असलो तरी जनतेने शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. कुणाची दुसरी टर्म असेल, तिसरी टर्म असेल. आपल्यामागे उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद होता. सर्व आमदारांनी मतदारसंघाचा, मतदारांचा आदर करावा आणी परत यावे, असे आवाहन देशमुखांनी केले.

कुठेही सही केली नाही

शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या ठरावावर मी सही केली नाही. शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे यांच्याशी चर्चा करुन गाडीत बसलो होतो. आम्ही सुरतला जाणार आहोत याचा मागमूसही नसल्याचे देशमुखांनी स्पष्ट केले.

शिंदे साहेबांसह सर्व आमदारांनी परत यावे

पक्षाने सेना आमदारांना खुप काही दिले आहे. ठाकरे साहेबांच्या प्रेमापोटी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी परत यायला पाहिजे. मी यानिमित्ताने त्यांना विनंती करतो की, त्यांनी ठाकरे साहेबांच्या प्रेमासाठी, जनतेच्या विश्वासासाठी परत यावे असे भावनिक आवाहनही नितीन देशमुख यांनी केले.

हेही वाचा

Back to top button