अजय चौधरी हेच शिवसेनेचे गटनेते; विधानसभा उपाध्यक्षांनी शिंदे गटाचे नियुक्ती पत्र फेटाळले | पुढारी

अजय चौधरी हेच शिवसेनेचे गटनेते; विधानसभा उपाध्यक्षांनी शिंदे गटाचे नियुक्ती पत्र फेटाळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. बंडखोर गटाने शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते एकनाथ शिंदे हेच असून, अजय चौधरी यांची केलेली नियुक्ती अवैध असल्याचा दावा केला होता. पण त्यांचा हा दावा फेटाळत कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो तर गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. त्यामुळे अजय चौधरी हे शिवसेनेचे गटनेते असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तब केले. तर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना हटवून महाडचे आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करणारे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले होते. यावर झिरवळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले की, शिंदे यांनी केलेला दावा हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. गटनेते पदाची नियुक्ती अवैध ठरवणाऱ्या पत्रावर नितीन देशमुख यांची सही आहे. पण देशमुख यांनी ‘त्यांची सही इंग्रजी करतो, पत्रावरील सही मराठीमध्ये आहे. ती सही ग्राह्य धरू नये’ असे सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गटाने पत्रावर केलेली सही देशमुखांचीच आहे का हे तपासून निर्णय घेतला जाईल असे झिरवळ म्हणाले.

तसेच कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो तर गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली असल्याचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ?

Back to top button