चंद्रपूर : वाघ, बिबट्यापासून संरक्षणासाठी वनविभाग ॲक्‍शन माेडमध्‍ये, लोखंडी जाळी लावण्यास सुरूवात | पुढारी

चंद्रपूर : वाघ, बिबट्यापासून संरक्षणासाठी वनविभाग ॲक्‍शन माेडमध्‍ये, लोखंडी जाळी लावण्यास सुरूवात

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा
चंद्रपूर महानगराला लागून असलेल्या दुर्गापूर, उर्जानगर, नेरी व कोंडी गावांमध्‍ये मागील काही दिवसांमध्‍ये वाघ व बिबट्यांनी घरात घूसून नागरिकांवर हल्‍ले केले. अखेर उशिरा का होईना, वनविभागाने याप्रश्‍नी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. या भागात १.२५ किमी. लांब व १५ फूट उंचीची लोखंडी जाळी लावण्यास सुरूवात केली आहे.

चंद्रपूर महानगराला लागूनच असलेल्या नेरी, कोंडी व दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक १, २ व ३ परिसरात वाघ, बिबट्या व अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. आत्तापर्यंत वाघ व बिबट्यांच्या हल्यात डझनभर नागरिकांचे जीव गेले आहेत. थेट गावात येऊनच बिबट नागरिकांना उचलून नेऊ लागल्याने दुर्गापूर व उर्जानगर पसिरात भितीमय वातावरण पसरले होते.

दोन बिबट्यांना जेरबद केल्यानंतरही हे हल्ले थांबलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाबद्दल प्रचंड राेष होता. उर्जानगरात नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बंदीस्त करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र उपायोजना करण्यास कानाडोळा करण्यात येत होता. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन भटारकर यांनी आंदोलन करून उपाययोजना करण्यास वनविभागाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतरही उपाययोजना करण्यास दुर्लक्ष झाले होते.

दिवसाआड नागरिकांवर होणारे बिबट्याचे हल्ले वाढल्याने नागरिकांचा प्रशासनावर प्रचंड रोष होता. बिबट्याच्या हल्यात गावातील नागरिक व लहान मुलांनाही बळी पडावे लागले होते. यानंतर चंद्रपूर वन विभागाने प्राथमिक स्तरावर असुरक्षित परिसरात जवळपास १.२५ किलोमीटर लांबीच्या रोडवर सोलर लाईट सह १५ फूट उंच लोखंडी जाळीचा वेढा देण्याच्या कामास सुरूवात केली आहे. यामुळे आता बिबट्यांना जंगलसदृश्य भागाला लागून असलेल्या परिसरातून दुर्गापूर, नेरी, कोंडी व उर्जानगर परिसराकडे प्रवेश करता येणार नाही. बिबट्याचे हल्ले थांबण्यास मदत होणार असल्याचे वनविभागाचे म्हणने आहे.

प्राथमिक स्तरावर सव्वा किलोमीटर बसवण्यात आलेल्या जाळीमुळे या भागातील काही कच्चे पायवाट असलेले रस्ते मात्र बंद होऊ शकतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी जबाबदारीने लावण्यात येणारी लोखंडी जाळी तोडू नये असे, आवाहन करण्यात आले आहे. विशेषता याच परिसरात सौरउर्जेवरील दिवे लावून विद्युत व्यवस्था करण्यात अल्याने बिबट्यांचे होणारे हल्ले रोखण्यास मदत होणार आहे.

 नागरिकांच्या आंदोलनाला यश

वाघ व बिबट्याच्या सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे दुर्गापरू, उर्जानगर व नेरी कोंउी येथील नागरिक भयभीत झाले होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचे जीव गेल्यानंतर नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. यानंतर वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.

वेकोली परिसरात झुडपी जंगल वाढल्याने वाघ व बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे. वकोली प्रशासन व ग्रामपंचायतीने जंगल साफ करावे, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सतत पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सतत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उपाययोजने संदर्भात लेखी पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर वनविभागाने दुर्गापूर, उर्जानगर, नेरी व कोंडी येथील नागरिकांच्या जिवीतास धोका लक्षात घेता, उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांनी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर समाधान मानले आहे.

Back to top button