नगर : पिस्तूल दाखवून अपहरण करत खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक | पुढारी

नगर : पिस्तूल दाखवून अपहरण करत खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

नगर- एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचे अपहरण करत ३ लाख ५० हजारांची खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी वेशांतर करून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा.उंबरे, ता. राहुरी), सुधीर संपत मोकळ (रा.पारेगाव ता.कोपरगाव), संदीप उर्फ बंडू रंगनाथ कोरडे (रा.घोगरगांव, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी दि.२७ एप्रिल रोजी भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (रा.मुसळे वस्ती, लोणी, ता. राहता) यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे कार मध्ये बसवून अपहरण केले होते. त्यांच्या खिशातील ११ हजार ५०० ची रोकड, मोबाईल, पल्सर मोटारसायकल काढून घेत त्यांना ३ लाख ५० हजारांची खंडणी मागितली होती.लोहारे गावातील मंदिरासमोर गेल्यावर तेथे गर्दी पाहून देव्हारे यांनी वाचविण्यासाठी आरडाओरडा केला.

त्यावेळी नागरिकांनी कार अडविली. व देव्हारे यांची सुटका केली तर आरोपी पसार झाले होते. या बाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा समांतर तपास करत असताना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, स.फौ. राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पो.हे.कॉ. बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पो.ना. भिमराज खर्से, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पो.कॉ. रणजीत जाधव व पो.हे.कॉ. बबन बेरड आदिंच्या पथकाने या तिघांना अटक केली.

 

Back to top button