चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वनविकास महामंडळाच्या बल्लारशहा आगार विभागातील उच्च दर्जाचा सागवान 'सेंट्रल विस्टा' योजनेअंतर्गत दिल्ली येथे उभारल्या जाणार्या नव्या संसद भवनाला सुशोभित करणार आहे. या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी जवळपास 300 घनमीटर सागवान लाकडाची खरेदी करण्यात आली आहे. यातूनच वनविकास महामंडळाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. दोन दिवसात 22 कोटींच्या सागवानाची विक्री करण्यात आली असून, 2022-2023 मध्ये 165 कोटींच्या सागवानाची या आगारातून विक्री झाली आहे.
महाराष्ट्र वनविकास महामंडळ हे शासनाचे अंगीकृत व्यवसाय केंद्र आहे. महामंडळात दर्जेदार सागवानाचे संकलन करून त्याची विक्री केली जाते. वनविकास महामंडळातील दर्जेदार सागवानाचा भारताच्या संसद भवनासाठी वापर होत असल्याची बाब महामंडळासाठी गौरवास्पद आहे.
7 जून 2022 रोजी बल्लारशहा विक्री आगारातून जाहीर लिलालावात 'फायनल फिलिंग' या दर्जेदार सागाची विक्रमी विक्री करून महामंडळाला दोन दिवसात 22 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. येथून 2022-2023 या वर्षात 165 कोटी रुपयांच्या वनउपजाची विक्री झाली असून, मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. 'ऑफलाईन' लिलावात जवळपास 100 कोटी रुपयाचा महसूल महामंडळाला मिळाला आहे.