नसरापूर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून भोर तालुक्यात तुरळक ठिकाणी पावसाने शिडकावा केला आहे. गुंजनमावळ खोर्यातील शेतकर्यांनी पेरणीसाठी शेतशिवार तयार करून ठेवले आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत.
उन्हाची तीव्र ता वाढत असल्याने हातवे येथील गुंजवणी नदीच्या तीरावर नागरिक पोहण्यासाठी जात असल्याचे अजूनही चित्र आहे. गुंजनमावळ या खोर्यातील दिडघर, केतकावणे, हातवे, भिलारेवाडी, तांभाड, मोहरी, सोंडे, वडगाव झांजे, कार्ले सोंडे, कोदवडी, सुरवाड आदी गावातील शेतकर्यांनी पेरणी करण्यासाठी शेतीची पूर्व मशागत व वखरणी करून शेत तयार केले आहे.
भाताचे तरवे टाकण्यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्र संपून देखील वळीव पाऊस पडला नाही. तसेच मृग नक्षत्र सुरू होऊन देखील पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके धोक्यात येण्याची शक्यता हातवे खुर्द येथील शेतकरी भगवान खुटवड यांनी व्यक्त केली आहे.
मे महिन्याच्या मध्यावर वळीव पावसाने साथ सोडल्यानंतर मृग नक्षत्रातही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत या वर्षात खरिपाचे क्षेत्र वाढलेले असताना पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्यांपुढे संकट उभे आहे.
पेरणीपूर्व मशागतीची कामे 100 टक्के झाली आहेत. येत्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्यास येत्या 15 दिवसांत पेरणीची कामे पूर्ण होतील. मात्र 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणी करू नये.
-राहुल दिघे, कृषी सहायक अधिकारी, नसरापूर मंडल
पावसाने ओढ दिल्याने बियाण्याला उठाव नसल्याने विक्रीवाचून बी-बियाणे, खते पडून आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्यास शेतकर्यांसह बी-बियाणे विक्री दुकानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
-अंकुश जगताप, बी-बियाणे विक्रते, नसरापूर.