आता एवढंच बाकी राहिलं होतं! नागपुरात चोरट्यांनी चक्क आईस्क्रिमच चोरलं | पुढारी

आता एवढंच बाकी राहिलं होतं! नागपुरात चोरट्यांनी चक्क आईस्क्रिमच चोरलं

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात चोरट्यांनी चक्क आईस्क्रीम दुकानाला लक्ष्य करून आईस्क्रिम चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक नाही तर चक्क दोन दुकाने चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली. या आईस्क्रीम चोरीची नागपुरात चांगलीच चर्चा रंगली आहे. नागपूर शहरातील धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत या दोन आईस्क्रिम पार्लरवर चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला आणि आइस्क्रीम घेऊन पसार झाले. मात्र ही आइस्क्रीम चोरट्यांनी खाण्यासाठी चोरले की विकण्याकरीता याबद्दलचा शोध धंतोली पोलीस घेत आहेत.

नागपूर शहरातील खामला परिसरात दादाजी शिंदे यांच्या आईस्क्रीम पार्लरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. या दुकानातून जवळपास पंधरा हजार रुपयांचे आईस्क्रीम चोरट्यांनी लांबविले. त्यानंतर सावरकरनगर मधील रमेश खवले यांच्याही डेअरीची कुलूप तोडून दोन हजारांचे आईस्क्रिम चोरून नेले. एकाच रात्री दोन आईस्क्रिम पार्लवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेचे सीसीटीव्हीत फुटेज मिळाले आहे. सावरकर नगरातील डेअरीमध्ये चोरटे कुलूप तोडून शिरले. यावेळी त्यांनी याच दुकानात चॉकलेट शेक आणि इलायची दोन दोन अशा चार रिकाम्या बॉटल मिळून आल्याने त्यांनी ते बदाम शेक पिले असावे असेही रमेश खवले सांगतात.

त्यानंतर त्यांनी दुकानातील चार आईस्क्रिमचे फॅमिली पॅकचे डब्बे, त्यात चॉकलेट आईस्क्रिम, कुकीक्रम, मँगो, शाही मेवा मलाईचे डब्बे चोरून नेल्याचे सांगितले. असा एकूण १२०० ते १५०० रुपयाचे आईस्क्रिम आणि काही रोखही चोरून नेलेत. यासोबतच नरेंद्र नगर भागातील दादा शिंदे यांच्या दुकानातुन कुलूप कापून चोरट्यानी आतमध्ये प्रवेश केला. त्यात त्यानी सुमारे १५ हजाराचे आईस्क्रिम म्हणजे सुमारे ७५ किलोपेक्षा जास्त आईस्क्रिम चोरट्यानी चोरून नेले आहे. गेल्या काही वर्षातील आईस्क्रिम चोरीची ही पहिलीच घटना आहे हे विशेष.

हे ही वाचा :

Back to top button