धक्कादायक! ‘पबजी’च्या व्‍यसनातून मुलाने केली आईची हत्या, मृतदेहाची दुर्गंधी घालवण्यासाठी वापरला रुम फ्रेशनर | पुढारी

धक्कादायक! 'पबजी'च्या व्‍यसनातून मुलाने केली आईची हत्या, मृतदेहाची दुर्गंधी घालवण्यासाठी वापरला रुम फ्रेशनर

लखनौ; पुढारी ऑनलाईन

‘पबजी गेम’च्या आहारी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना लखनौ येथे घडली आहे. साधना सिंह (वय ४०) असे त्या आईचे नाव आहे. कौर्याची परिसीमा म्हणजे मुलगा दोन दिवस आणि तीन रात्री मृतदेहासोबत घरीच राहिला. त्याने आपल्या लहान बहिणीला पोलिसांना किंवा इतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने दुर्गंधी कमी करण्यासाठी रुम फ्रेशनर आणि डिओड्रेंटचा वापर केल्याचेही आढळून आले आहे.

जेव्हा मंगळवारी दुर्गंधी येऊ लागली तेव्हा शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. जेव्हा अल्पवयीन मुलाची याप्रकरणी चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे पती सैन्यात सुभेदार मेजर (जेसीओ) पदावर आहेत. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते मूळचे वाराणसी येथील आहेत. सध्या ते पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे सैन्यात सेवा देत आहेत. पत्नी साधना सिंह, १६ वर्षाचा मुलगा आणि ९ वर्षाची मुलगी असा त्यांचा परिवार आहे. ते लखनौमधील पंचमखेडा येथील जमुनापूरम कॉलनीत राहतात. शनिवारी रात्री साधना ह्या झोपी गेल्या होत्या. दरम्यान, रात्री ३ वाजता मुलाने वडिलांची परवानाधारक पिस्तुल घेऊन आईच्या डोक्यात गो‍ळ्या झाडल्या. यामुळे साधना यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने छोट्या बहिणीला धमकावून दुसऱ्या खोलीत नेले. सकाळी उठल्यानंतर त्याने पुन्हा बहिणीला, जर याची माहिती पोलिसांनी दिलीस तर जिवे मारीन अशी धमकी दिली.

खोलीत रुम फ्रेशनर मारत राहिला….

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आईची हत्या केल्यानंतर मुलगा दोन दिवस, तीन रात्री घरातच राहिला. या दरम्यान तो ज्या खोलीत आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिथे तो जाऊन पुन्हा पुन्हा पहात होता. दुर्गंधी येऊ नये म्हणून तो खोलीत रुम फ्रेशनर मारत राहिला. पण मंगळवारी रात्री दुर्गंधी वाढल्याने त्याला भिती वाटू लागली. त्यानंतर त्याने वडिलांना फोन करुन आईला कोणीतरी मारल्याचे सांगितले. आम्हा दोघांना खोलीत बंद केले होते. कसेतरी बाहेर पडल्याचा त्याने बहाणा केला. त्यानंतर त्याच्या वडिलानी शेजाऱ्यांना कॉल करत घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दोन्ही मुलांना घरातून बाहेर आणून खोली सील केली. ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह पडला होता तिथे पिस्तुल आढळून आली आहे. दुर्गंधी कमी करण्यासाठी रुम फ्रेशनर आणि डिओड्रेंटचा वापर केल्याचे आढळून आले आहे.

पबजी खेळत असल्याने आईने मारले होते

पबजी खेळत असल्याने आई मारहाण करत होती. घरातून १० हजार रुपयेदखील गायब झाले होते. हे पैसे मीच चोरल्याचा आरोप करत आईने मारले होते. या रागातूनच आईची हत्या केल्याची कबुली मुलाने पोलिसांसमोर दिली आहे. या घटनेने लखनौ शहर हादरले आहे.

अल्पवयीन मुलगा दहावीत शिकत आहे. तो पबजी गेमच्या आहारी गेला होता. सोशल मीडियावरही तो सक्रिय असायचा. पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. पोलिस याप्रकरणी मुलाची चौकशी करत आहे.

 हे ही वाचा :

Back to top button