नागपूर : समीर वानखेडे पोपट, त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही : नाना पटोले | पुढारी

नागपूर : समीर वानखेडे पोपट, त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील क्रूझ पार्टीवर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. तर या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबीरानिमित्त आले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा सातत्याने दुरुपयोग होत आहे. हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आर्यन खान प्रकरणातही कॉंग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेतील एक पोपट होता. या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आपल्याला येत्या काळात दिसून येईल, असेही पटोले म्हणाले.

राज्यसभेवर प्रियांका गांधी यांच्या तिकीटाबाबत प्रश्न विचारले असता, ‘महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रियांका गांधी यांना तिकीट मिळाली तर सर्व कॉंग्रेसजन स्वागत करणार’ असेही ते म्हणाले.

‘हनुमान चालीसा हा आस्थेचा विषय आहे. मी हनुमान चालीसा वाचून घरातून निघतो. त्याची जाहिरात आम्ही केली नाही आणि करतही नाही. तसेच राणा दाम्पत्यावर काहीही बोलणार नाही. देशासमोर सध्या दुसरे महत्वाचे प्रश्न आहेत. गरीबी, महागाईमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दुसरीकडे मोदी सरकारकडून देश विकण्याचे काम सुरु आहे.’

नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून सोशल मीडियावर दररोज ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मात्र कॉंग्रेस तसे करणार नाही. जनतेसमोर वस्तूस्थिती मांडण्यासाठी कॉंग्रेसने नागपुरात कॉंग्रेसने नवसंकल्प शिबीराचे आयोजन केले आहे. यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ३२५ पदाधिकारी सहभागी झाले आहेत. तसेच रविवारी आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात मोठ्यासंख्येत पदाधिकारी येणार आहेत. यात कार्यकर्त्यांना अनुभवी नेते, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button